काळू धरणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
चासोळे येथील सभेत १८ गावांचा एकमताने ठराव; श्रमिक मुक्ती संघटनेचा एल्गार
टोकावडे, ता. १७ (बातमीदार) : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर चासोळे येथील श्री हटकेश्वर मंदिर परिसरात काळू धरणग्रस्त शेतकऱ्यांची विराट ‘एल्गार सभा’ पार पडली. या सभेत काळू धरण क्षेत्रामुळे बाधित होणाऱ्या १८ गाव-पाड्यांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रकल्पाला आपला ठाम आणि एकमुखी विरोध दर्शविला आहे.
श्रमिक मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा इंदवी तुळपुळे आणि शाही धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत सरकोत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही सभा झाली. शासनाकडून आगामी काळात पुनर्वसनासंदर्भात ग्रामसभा घेण्याचे नियोजन आहे; मात्र आम्हाला धरणच नको, तर पुनर्वसनाचा प्रश्नच उरत नाही, अशी आक्रमक भूमिका या सभेत घेण्यात आली. येणाऱ्या सर्व ग्रामसभांमध्ये धरणाविरोधात एकमताने ठराव मंजूर करून शासनाच्या धोरणांना प्रखर विरोध करण्याचा निर्णय याप्रसंगी घेण्यात आला.
सभेला संबोधित करताना प्रशांत सरकोत यांनी ग्रामस्थांना आपल्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. ‘‘स्वतःच्या जल-जमीन आणि भूमीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक भूमिपुत्राची आहे,’’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. तर इंदवी तुळपुळे यांनी या प्रकल्पाचे सामाजिक आणि पर्यावरणीय दुष्परिणाम मांडत शासनाच्या पुनर्वसन धोरणातील त्रुटींवर कडाडून टीका केली.
एकजुटीची वज्रमूठ
सभेच्या सुरुवातीला माजी उपसभापती दिवंगत भगवान भला यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित प्रत्येक गावातील प्रतिनिधींनी आपापल्या गावाची बाजू मांडली आणि कोणत्याही परिस्थितीत आपली जमीन धरणासाठी देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतांतून प्रकल्पाविरोधातील तीव्र संताप दिसून येत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.