डोंबिवलीत पुन्हा घरफोडीचा धडाका
देसलेपाड्यात ४० तोळे सोने, ५० हजारांची रोकड लंपास
डोंबिवली, ता. १७ : शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता देसलेपाडा परिसरात एक मोठी चोरी उघडकीस आली आहे. आर. पी. रेसिडेन्सीमधील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ४० तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देसलेपाडा येथील आर. पी. रेसिडेन्सीमध्ये आशीष रामधनी यादव हे वास्तव्यास आहेत. ते कुटुंबासह लग्नसमारंभासाठी उत्तर प्रदेश येथील आपल्या मूळ गावी गेले होते. घराच्या सुरक्षेसाठी त्यांनी चावी सोनारपाडा येथे राहणाऱ्या आपली बहीण मायादेवी यांच्याकडे सोपवली होती. ९ फेब्रुवारी रोजी घरात पेस्ट कंट्रोलचे काम करून घर व्यवस्थित लॉक करण्यात आले होते.
१५ फेब्रुवारी रोजी घराच्या वॉटर फिल्टर दुरुस्तीसाठी कंपनीचा प्रतिनिधी येणार होता. त्यासाठी मायादेवी आणि त्यांचे पती दुपारी १ वाजता यादव यांच्या घरी पोहोचले. या वेळी त्यांना घराच्या सेफ्टी डोअरची आणि मुख्य दरवाजाची कडी तुटलेल्या अवस्थेत दिसली. घरात प्रवेश केला असता, दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी असून, लॉकर तोडलेले होते. चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले होते. या घटनेची माहिती मिळताच यादव कुटुंबीयांना धक्का बसला. प्राथमिक तपासणीत चोरट्यांनी कपाटातील सुमारे ५० हजार रुपयांची रोकड आणि अंदाजे ४० तोळे सोन्याचे दागिने असा मोठा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.