आरोग्यसेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : तळागाळात जाऊन वर्षानुवर्षे लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत, त्यांचे योगदान हे अमूल्य असल्याचे मत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी व्यक्त केले. ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. संशयित क्षयरुग्णांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधिक स्वरीपात २० आशा वर्कर्संना शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांसह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत, आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन देत आणि आजारांबाबत जनजागृती करत आशा वर्कर्स आरोग्य यंत्रणेचा भक्कम आधारस्तंभ ठरत आहेत. संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणे ही जबाबदारीची भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे. अनेक आशा वर्कर्सनी निर्धारित उद्दिष्टांपेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करून आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली असल्याचे शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले, तर कृष्णा पाटील यांनीदेखील आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक करीत ठाणे महापालिका त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तर प्रास्ताविकपर भाषणात मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक केले.
महानगर गॅसकडून सव्वा कोटींचा निधी
महानगर गॅस लिमिटेड यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी सव्वा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दोन अॅडव्हान्स सोनोग्राफी मशीन आणि एक २ डी इको मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे लोकार्पण शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. अत्याधुनिक तपासण्या स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.
‘हिंद दी चादर’ शहीदी समागम शताब्दीनिमित्त फलकाचे अनावरण
‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे शीख धर्मातील नववे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दीनिमित्तच्या कार्यक्रमाच्या फलकाचे अनावरणही महापौरांच्या हस्ते करण्यात आले. या शताब्दी वर्षानिमित्त आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.