ठाण्यात चोरीचे सावट कायम
गुन्ह्यांचा आलेख घटला, तरीही कोट्यवधींची ‘लूट’ सुरूच!
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : शहरात चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये काही प्रमाणात घट झाली असली, तरी चोरट्यांनी सर्वसामान्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर डल्ला मारणे सुरूच ठेवले आहे. पोलिस प्रशासनाने गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढवले असले, तरी चोरीला गेलेला ऐवज परत मिळवण्यात अजूनही मोठे आव्हान कायम असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये घरफोडीच्या घटनांत १४.९६ कोटी रुपयांचा माल चोरीला गेला, त्यापैकी केवळ ४.२० कोटी रुपयांचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. ‘इतर चोरी’च्या प्रकारात तर २०२४ च्या तुलनेत (१४.४६ कोटी) २०२५ मध्ये चोरीच्या रकमेचा आकडा वाढून १६.६४ कोटी वर पोहोचला आहे. यामुळे गुन्हे कमी झाले तरी चोरीची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे, तर ठाण्यात वाहनचोरीचे सत्र अजूनही कायम आहे. दररोज सरासरी ३ ते ४ वाहने चोरीला जात असून, २०२५ मध्ये १२४८ गुन्हे नोंदवले गेले आहेत. वाहनचोरी उघडकीस आणण्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून कमी असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली असल्याचे सकारात्मक चित्रही समोर आले आहे. २०२४ मध्ये १,५०५ आरोपींना अटक करण्यात आली होती, तर २०२५ मध्ये हा आकडा ५०० ने वाढून २,०१३ वर पोहोचला आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही अनेक विभागांत १० ते १५ टक्क्यांनी सुधारले आहे.
तुलनात्मक आकडेवारी
गुन्ह्याचा प्रकार वर्ष २०२४ (गुन्हे) वर्ष २०२५ (गुन्हे) स्थिती
घरफोडी ७८० ६८४ घट
जबरी चोरी २४६ १५३ लक्षणीय घट
सोनसाखळी चोरी २१३ १४३ घट
वाहन चोरी १३५१ १२४८ किंचित घट
इतर चोरी ११८५ १०८३ घट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.