राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी साक्षी मोरेची निवड
घाटकोपर, ता. १८ : मुंबई विद्यापीठातर्फे सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर (ठाणे) येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ स्तरीय आंतरमहाविद्यालयीन कुस्ती (महिला) स्पर्धा २०२५-२६मध्ये उल्लेखनीय यश संपादन करण्यात आले. ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम) येथील इंदिरा गांधी महाविद्यालयची विद्यार्थिनी साक्षी संजय मोरे (एफवायबीए) हिने ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तसेच अमृताकुमारी लक्ष्मण यादव (टीवायबीए) हिने ५० किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले.
सुवर्णपदक विजेती साक्षी मोरे हिची १७ ते २० मार्च २०२६ दरम्यान कुरुक्षेत्र विद्यापीठ, हरियाना येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती (महिला) स्पर्धा २०२५-२६ साठी निवड झाली आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी, कुस्ती (पुरुष), ५ व १० किलोमीटर धावणे तसेच क्रॉस कंट्री स्पर्धांसाठी निवड झाली असून, महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशाची परंपरा अधोरेखित झाली आहे.
महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या साक्षी मोरे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे, संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे तसेच प्रभाग १२३चे नगरसेवक सुनील मोरे यांनी तिचे आणि तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सतीश कदम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.