जव्हारमध्ये अनेक विकासकामांना स्थगिती
अनामत रक्कमही रखडल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजी
जव्हार, ता. १९ (बातमीदार) : आदिवासी उपयोजनेअंतर्गत जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या विकासकामांना नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली. ही कामे पुढे रद्द करण्यात आली. त्यामुळे त्या वेळी अनेक कंत्राटदारांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या आदिवासीबहुल तालुक्यांमधील तब्बल २७८ कामे रद्द झाली होती. मात्र, कंत्राटदारांनी भरलेली अनामत रक्कम, इसारा रक्कम अद्याप त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे कामेही स्थगित, अनामत रक्कमही रखडली अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजीचे सूर आहे.
आदिवासी उपयोजनेअंतर्गत रस्ते, पूल, पाइप मोऱ्या, साकव आदी विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करत कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मात्र, सरकार बदलल्यानंतर ही कामे रद्द करण्यात आली. कामे रद्द झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांनी भरलेली अनामत रक्कम, इसारा रक्कम तसेच एफडीआरची रक्कम त्यांनी परत मागितली. मात्र, ही रक्कम परत देण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून संबंधित कंत्राटदारांची लाखो रुपयांची रक्कम जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अडकून पडली असल्याची माहिती कंत्राटदारांनी दिली. वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत ठाणे अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशाचा दाखला देत बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता, अद्याप अधीक्षक अभियंता ठाणे यांचे आदेश प्राप्त झालेले नाहीत, असे कारण विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आदेशाच्या प्रतीक्षेच्या कारणावर तीन वर्षे उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कंत्राटदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
इसारा रक्कम व ‘एफडीआर’ ही रखडला
विकासकामांना कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी या रकमा कंत्राटदारांना भराव्या लागतात. मात्र, कामेच रद्द झाल्याने अनामत व इसारा रक्कम परत करणे ही सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार यांची प्रशासकीय जबाबदारी असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षांपासून निधीअभावी कंत्राटदारांची देयके रखडलेली आहेत. त्यामुळे रद्द झालेल्या कामांची अनामत, इसारा व एफडीआरच्या रकमेवर त्यांची आशा होती. मात्र, या रकमादेखील न मिळाल्याने छोट्या कंत्राटदारांची अवस्था बिकट झाली आहे. याबाबत जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अमित पाटील यांनी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते रजेवर आहेत, असे सांगितले व वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत मार्गदर्शनपर सूचना मागवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.