सवलतींचा पाऊस तरीही टीएमटी मालामाल
दररोजचे २३ लाखांचे उत्पन्न ३० लाखापर्यंत पोहचले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) उपक्रमाने विविध प्रवासी सवलती लागू केल्याने उत्पन्नात घट झाली होती. ही घट भरून काढण्यासाठी मार्गांची पुनर्रचना, तिकीट तपासणी मोहिमा आणि प्रवाशांना डिजिटल तिकीट प्रणाली याचा वापर वाढविण्यात प्रवाशांना प्रोत्साहित करणे यामुळे घटलेले उत्पन्न पुन्हा वाढवण्यात यश मिळवले आहे. काही महिन्यांपूर्वी दररोजचे उत्पन्न २२ ते २३ लाख रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र, प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे हेच उत्पन्न आता ३० लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
टीएमटीच्या ताफ्यात ४०७ बसगाड्या असून त्यापैकी सुमारे ३८० बस दररोज शहर व शहराबाहेरील विविध मार्गांवर धावतात. दररोज जवळपास पाच हजार ९६० फेऱ्या होतात आणि सुमारे दोन लाख ४५ हजार प्रवासी या सेवेद्वारे प्रवास करतात. ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणाऱ्या या उपक्रमास गेल्या काही वर्षांत आर्थिक ताण जाणवत होता. यामुळे महापालिकेच्या अनुदानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत होते. विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत, अपंग व्यक्तींना विशेष सवलत, १५ मार्च २०२४ पासून महिलांना ५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना लागू करण्यात आली. या निर्णयांचा सामाजिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम झाला असला तरी, उत्पन्नात घट झाली आणि दररोजची कमाई २२-२३ लाखांवर आली होती. या पार्श्वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी टीएमटी प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते.
टीएमटीच्या उपाययोजना
१. ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या कमी, त्या मार्गावरील बस फेऱ्यांची संख्या कमी करून त्याजागी जास्त प्रवासी असलेल्या मार्गांवर बस वळविण्यात आल्या.
२. विनातिकीट प्रवासा करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
३. ऑनलाइन तिकीट खरेदीला प्रोत्साहन देण्यात आले.
४. या उपाययोजनांमुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आणि महसूल वाढण्यास मदत झाली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
सेवा सुधारणेवर भर
दरम्यान, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी सांगितले की, मार्गांचे पुनर्रचना, तिकीट तपासणी मोहिमा आणि प्रवाशांना डिजिटल तिकीट प्रणालीकडे वळविणे यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. भविष्यातही सेवा सुधारणा आणि आर्थिक शिस्त यावर भर दिला जाणार आहे.
टीएमटीचा लेखाजोखा
एकूण बसेस - ४०७
रस्त्यावर धावणाऱ्या बसांची संख्या - ३८०
दररोज प्रवास करणारे प्रवासी - २ लाख ४५ हजार ०००
दररोजच्या फेऱ्या - ५,९६०
दररोज उत्पन्न - ३० लाख रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.