अंबरनाथ, ता. १९ (वार्ताहर) : महावितरणच्या कारभाराविरोधात अंबरनाथमध्ये नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. नियमित वीजबिल भरूनही कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ बुधवारी संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. डिजिटल (स्मार्ट) मीटर बसवल्यानंतर अनेक महिने बिल न देता थेट हजारो रुपयांचे थकीत बिल पाठवून जोडणी कापली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आठ ते १० महिने वीजबिल येत नाही. त्यानंतर अचानक मोठी रक्कम आकारून वीज तोडली जाते आणि तत्काळ बिल भरण्याचा दबाव टाकला जातो. या अन्यायाविरोधात लेखी व ऑनलाइन तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी अधिकारी अलका कवले यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. घराघरांत वीज नसल्याने होणारा त्रास अधिकाऱ्यांना जाणवावा, यासाठी काही वेळ त्यांच्या दालनातील वीज बंद करून रोष व्यक्त करण्यात आला.
बुधवारी सकाळी अंबरनाथ शहरात अचानक वीजपुरवठा खंडित झाला. तासन् तास प्रतीक्षा करूनही वीज सुरळीत न झाल्याने नागरिकांनी कार्यालयात धाव घेतली; मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. बिल भरूनही जोडणी का कापली? असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मनसेचे बबलू खान यांनी, महावितरणच वीजजोडणी करते आणि कापते; मग अधिकाऱ्यांना माहिती कशी नाही? असा रोखठोक प्रश्न उपस्थित करत डिजिटल मीटरच्या नावाखाली सामान्य नागरिकांची लूट सुरू असल्याचा आरोप केला. एकूणच, अचानक वीजकपात, विस्कळित बिलिंग आणि संवादाचा अभाव यामुळे अंबरनाथमध्ये महावितरणविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांनी तत्काळ दिलासा व पारदर्शक कारभाराची मागणी केली आहे.
ग्राहकांची आरोळी
दरम्यान, राज्यात बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असताना वीज तोडल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांनी अंधारात अभ्यास कसा करायचा? असा सवाल पालकांनी केला. एका घरात हळदीचा कार्यक्रम सुरू असताना वीजकपात झाल्याने कार्यक्रमात अडथळा आल्याचा अनुभवही समोर आला. चार दिवसांपूर्वी ऑनलाइन बिल भरूनही वीज कापल्याने तत्काळ जोडणीची मागणी नागरिकांनी केली आहे.
मुख्य कार्यालयाकडून कारवाई
या सर्व प्रकरणावर अधिकारी अलका कवले यांनी, स्मार्ट मीटरधारक आणि ४५ दिवसांहून अधिक थकीत बिल असलेल्या ग्राहकांची जोडणी तोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यालयाकडून बुधवारी सकाळी मिळाली. स्मार्ट मीटरची जोडणी आमच्याकडे नसून मुख्य कार्यालयाकडे , असे सांगितले. ऑनलाइन बिल भरलेल्या ग्राहकांची सेवा तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्षात मात्र अद्याप अनेक घरांत वीज आली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. ऑटो-डिस्कनेक्शननंतर बिल भरल्यावर किती वेळात वीजपुरवठा सुरळीत होतो, याची चाचणी म्हणून हा प्रोग्राम आजच प्रायोगिक तत्त्वावर मुख्य कार्यालयाकडून सुरू केल्याचे कवले यांनी स्पष्ट केले.
महावितरणकडून सहा महिन्यांचे तब्बल ५४,६८० रुपये बिल देण्यात आले. रीडिंगप्रमाणे बिल यावे यासाठी अनेकदा पाठपुरावा केला; मात्र दाद मिळाली नाही. जुना मीटर बसवण्याचीही मागणी केली आहे.
- अशोक वाघे, वयोवृद्ध आदिवासी, आंबेवाडी-जावसई
जुन्या मीटरची वाहिनी जळाल्यानंतर दुरुस्तीऐवजी मीटर बदलण्यात आला. त्यानंतर दहा महिने बिलच आले नाही; वारंवार चौकशी केली असता रीडिंग पडत नसल्याचे सांगितले. आता अचानक दहा महिन्यानंतर ९,५०० रुपये बिल आले आहे. एवढी मोठी रक्कम कशी भरायची. याशिवाय, कोणतीही सूचना न देता बुधवारी सकाळी वीज खंडित केली. एकरकमी बिल भरण्याची सक्ती केली आहे.
- ज्योती भगवान दिघे, दिव्यांग महिला
अंबरनाथ : अचानक वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.