मुंबई

पनवेल नगरीत शिवजयंती उत्साहात साजरी

CD

पनवेल नगरीत शिवजयंती उत्साहात साजरी
पनवेल, ता. १९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात, ढोल-ताशा व लेझीमच्या गजरात पनवेल नगरी गुरुवारी (ता. १९) दुमदुमली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने लोकसहभागातून भव्य-दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व राज्यगीत सादर करण्यात आले. यानंतर मिरवणुकीची सुरुवात झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, उपविभागीय अधिकारी पवन चांडक आदी उपस्थित होते.
मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेतील महिला-पुरुष, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यामध्ये छत्रपतींच्या जीवनातील प्रसंग दर्शविणारे सात आकर्षक चित्ररथ होते. तसेच, विविध शाळांची १४ लेझीम पथके, ढोल-ताशा व बॅन्जो पथकांनी वातावरण भारावून टाकले. दांडपट्टा, तलवारबाजी यांसारख्या शिवकालीन कलेचे सादरीकरण पाच ठिकाणी करण्यात आले. हुतात्मा स्मारक चौक ते मौलाना आझाद चौक मार्गे निघालेली ही मिरवणूक टपाल नाका येथील अर्धाकृती पुतळ्याजवळ समारोपास आली.
यानंतर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पोवाडे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. शाहिरांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.
दरम्यान, ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये अमृत गटात सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आयुक्त मंगेश चितळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवजयंती मिरवणुकीसाठी लोकप्रतिनिधींनी आर्थिक योगदान देऊन सहभाग नोंदवला. विजेत्या लेझीम पथकांना व चित्ररथांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक मंडळांनी मिरवणुकीतील सहभागींसाठी पाणी, ताक, ज्यूस व खाद्यपदार्थांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिवराज्याभिषेक सोहळ्याने वेधले लक्ष
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने सादर केलेल्या राज्याभिषेक सोहळ्यावरील नाट्यप्रयोगाने विशेष दाद मिळवली. या कार्यक्रमात उपायुक्त स्वरूप खरगे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका विशेष आकर्षण ठरली. पारंपरिक वेशभूषा, दमदार देहबोली यामुळे त्यांनी शिवछत्रपतींची प्रतिमा अक्षरशः जिवंत केली. त्यांच्या अभिनयातील आत्मविश्वास, करारीपणा आणि राजस व्यक्तिमत्त्वामुळे उपस्थितांना ऐतिहासिक क्षण अनुभवत असल्याची भावना झाली. रंगमंचावरील त्यांच्या प्रवेशाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. या हुबेहूब साकारलेल्या भूमिकेमुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभली आणि सभागृहात शिवमय वातावरण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT