मुंबईत ‘अर्थशॉट प्राईज २०२६’चे आयोजन
मुंबई, ता. १९ : पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक प्रयत्नांना बळ देणारा ‘अर्थशॉट प्राईज २०२६’ पुढील वर्षी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. शहरात पहिल्यांदाच साजऱ्या होत असलेल्या क्लायमेट ॲक्शन वीकदरम्यान ही माहिती देण्यात आली. या घोषणेमुळे हवामान कृती आणि निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात भारताची वाढती जागतिक भूमिका अधोरेखित झाली आहे. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात विज्ञान, व्यवसाय, राजकारण आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
भारतातील पूर्वीच्या अर्थशॉट फायनलिस्ट्सनी पृथ्वीचे संरक्षण आणि पुनरुत्थान करण्यासाठी राबवलेल्या उपाययोजनांचा अनुभव उपस्थितांना सांगण्यात आला. द अर्थशॉट प्राईजचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रिन्स विल्यम यांनी या वेळी सांगितले की, ‘‘भविष्याकडे आशावादाने आणि तातडीने पाहणे आवश्यक आहे. भारत हा हवामान आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने जगातील महत्त्वाच्या देशांपैकी एक असून, येथे मिळणारे यश इतर देशांनाही प्रेरणा देऊ शकते. भारतातील तरुण पिढी पर्यावरणीय बदल प्रत्यक्षात घडवून आणत असल्याचे त्यांनी नमूद केले.’’ कार्यक्रमात बोलताना संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सदिच्छादूत आणि सस्टेनेबिलिटी अॅडव्होकेट दिया मिर्झा यांनी सांगितले की, अर्थशॉट प्राईजचे वैशिष्ट्य म्हणजे हा पुरस्कार केवळ चर्चांपुरता मर्यादित न राहता, प्रत्यक्ष परिणाम देणाऱ्या उपायांवर लक्ष केंद्रित करतो. भारतात हवामान उपाय व्यवहार्य, सर्वसमावेशक आणि मोठ्या प्रमाणावर राबवता येऊ शकतात, हे उदाहरणांमधून दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. अर्थशॉट प्राईजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ यांनीही आगामी कार्यक्रमाबाबत उत्साह व्यक्त केला. नोव्हेंबरमध्ये होणारे ‘अर्थशॉट २०२६’चे आयोजन हे आतापर्यंतचे सर्वात व्यापक आणि प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत होणारा हा सोहळा पर्यावरणीय नवकल्पना, हवामान नेतृत्व आणि जागतिक सहकार्य यांचा संगम ठरणार असून, २०३० पर्यंत पृथ्वीचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.