वक्तृत्व स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाचा ठसा
मुरुड, ता. १९ (बातमीदार) : मुरुड नगरपरिषदेतर्फे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत अव्वल क्रमांक पटकावला. स्पर्धा इयत्ता ८ वी ते १० वी व इयत्ता ११ वी ते पदवी अशा दोन गटांत पार पडली. विविध शाळा-महाविद्यालयांतील स्पर्धकांनी शिवरायांचा जाज्वल्य इतिहास ओघवत्या वाणीतून साकारला.
अंतिम फेरीत सुयश गायकर याने प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला, तर अंतरा मसाल हिने तृतीय क्रमांक मिळवला. प्रास्ताविकात डॉ. सुभाष म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले.
या वेळी प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, नगरसेवक पांडुरंग आरेकर, सतेज निमकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रवेश पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. श्रीशैल भैरगुंडे यांनी केले.
-----------------------------------------------------------
शहाबाज येथे शिवजयंतीनिमित्त वृक्षारोपण
पोयनाड, ता. १९ (बातमीदार) :
अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या प्रांगणात शिवजयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या उपक्रमाला सुरुवात झाली. १६१ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या ग्रंथालयाने वाचन चळवळीबरोबरच सामाजिक उपक्रमांतही अग्रेसर भूमिका घेतली आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मेडिकल असोसिएशन पोयनाड व ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष मंगेश भगत, डॉ. मकरंद पाटील, डॉ. विष्णू म्हात्रे, डॉ. प्रशांत बैकर तसेच ग्रंथपाल व कर्मचारी उपस्थित होते.
छायाचित्र :
पोयनाड : सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय शहाबाज येथे शिवजयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
-------------------------------------------------------------------
पेण तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
सार्वजनिक शाळेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात रॅलीचे आयोजन
पेण, ता. १९ (वार्ताहर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पेण तालुक्यासह शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी तालुक्यातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांसह शाळा, कॉलेजेस या ठिकाणी आज सकाळीच शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.तर शहरातील महाराजांच्या पुतळ्यास नगरपालिका, शासकीय अधिकारी, कर्मचारी यासह विविध संघटना यांच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करण्यात आले.तर सार्वजनिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखाव्यासह घोड्यावर विराजमान झालेले छोटे महाराज तसेच पालखीच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शाळेतील संचालकांसह मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभाग झाली होते.तर महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील अनेक शिवप्रेमी संघटनांनी एक दिवस अगोदरच रायगड किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणाहून पायी चालत शिवज्योत पेटवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येत त्याची सांगता करण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, अधिकारी किरण शहा, आरोग्य अधिकारी दयानंद गावंड, शिवाजी चव्हाण, प्रवीण बैकर, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, नगरसेवक आनंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते सी.आर.म्हात्रे आदींसह शाळेतील विद्यार्थी, नागरिक तसेच नगरपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.