ग्लोबल कोकण महोत्सवात नवउद्योजकांचा सहभाग
पालघर, ता. २१ (बातमीदार) : ग्लोबल कोकण महोत्सव २०२६अंतर्गत शिरगाव बीच येथे आयोजित ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन’ ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. राज्याच्या औद्योगिक व निर्यात क्षमतेला चालना देणाऱ्या या उपक्रमात प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि नवउद्योजकांचा सहभाग दिसून आला.
हा कार्यक्रम विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, डहाणू उपविभागीय अधिकारी विशाल खत्री तसेच सहसंचालक (उद्योग) विजू सिरसाठ उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी फटांगरे यांनी नोकरी घेणारे नव्हे, नोकरी देणारे व्हा, असे आवाहन करीत किनारी, डोंगरी व नागरी भागात वाढणाऱ्या औद्योगिक संधींचा लाभ घेण्यास युवकांना सांगितले. उपविभागीय अधिकारी खत्री यांनी स्थानिक प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी ठाम असल्याचे स्पष्ट करीत थेट संवाद साधण्याचे आवाहन केले.
सहसंचालक सिरसाठ यांनी प्रास्ताविकात पालघर जिल्ह्याने मागील वर्षी तब्बल रु. ३०,१३८ कोटींची निर्यात साध्य केल्याची माहिती दिली. ‘एक जिल्हा एक उत्पादन’अंतर्गत चिकू व सागरी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. नवउद्योजकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबई येथील विदेश व्यापार विकास अधिकारी प्रमोद थावरे यांनी निर्यातीसाठी आवश्यक परवाने व योजनांची माहिती दिली. उद्योग प्रतिनिधींनी निर्यात प्रोत्साहन परिषदांची भूमिका, विमा संरक्षण, वित्तीय सहाय्य, कौशल्य विकास व इज ऑफ डुइंग बिझनेस सुधारणा यांवर मार्गदर्शन केले. पर्यटन क्षेत्रातील होमस्टे, रिसॉर्ट व हॉटेल प्रकल्पांसाठी आवश्यक परवानग्यांबाबतही माहिती देण्यात आली. कार्यशाळेअंती प्रश्नोत्तर सत्रात उद्योजकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्र, रोटरी क्लब ऑफ विरार, एमसीईडी आणि मिटकॉन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वी ठरला. महोत्सवातील ओडीओपी दालनांमध्ये चिकू उत्पादने व तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना विशेष आकर्षण लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.