ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाचा जल्लोष
पालघर मिनी सरसचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
पालघर, ता. २१ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पालघर मिनी सरस २०२६’ या महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या भव्य विक्री व प्रदर्शन मेळाव्याचा बुधवारी (ता. १८) शिरगाव बीच, पालघर येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम ग्लोबल कोकण महोत्सवासोबत संयुक्तपणे आयोजित करण्यात आला असून, १८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हा मेळावा नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) इजाज अहमद, पंचायत विभागाचे अशोक पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते. या प्रदर्शनात पालघर जिल्ह्यातील ७३, रत्नागिरी १२, ठाणे ७, रायगड ५, पुणे २ तसेच नाशिक, जळगाव व कोल्हापूर येथील प्रत्येकी एक अशा एकूण १०२ स्वयंसहाय्यता समूहांचा सहभाग असून, सुमारे ८० स्टॉल हस्तकला व अन्य उत्पादनांचे तर २० स्टॉल विविध खाद्यपदार्थांचे आहेत. मेळाव्यात कोकणातील पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक खाद्यपदार्थांपर्यंत वैविध्य अनुभवायला मिळत आहे. जिल्हा परिषदेमार्फत आगामी अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर फोल्डर म्हणून वापरण्यासाठी १०० कापडी पिशव्यांची ऑर्डर स्वयंसहाय्यता समूहांना देण्यात आली. यामुळे महिलांना थेट व्यवसाय संधी उपलब्ध झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही वैयक्तिकरीत्या पिशव्या खरेदी करून महिलांना प्रोत्साहन दिले.
ग्रामीण महिलांच्या कौशल्याचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव ठरणाऱ्या या मेळाव्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
---------
विविध वस्तूंना मागणी
रस शिरवाळे, पातोळ्या, केळवे येथील प्रसिद्ध बेक्ड योगर्ट, घरगुती मसाले, लोणची, पापड, सोलकढी, कोकम सरबत, मिलेट्सपासून तयार पदार्थ, विविध शाकाहारी व मांसाहारी जेवण यांना विशेष मागणी आहे. तसेच खादीच्या पिशव्या, कापडी व ज्यूट बॅग, कोल्हापुरी चपला, वारली पेंटिंग, बांबू व लाकडी कलाकुसर, आदिवासी दागिने, हातमागावरील वस्त्रे, जव्हार येथील निर्गुडीचे तेल, आयुर्वेदिक उत्पादने, नैसर्गिक साबण, अगरबत्ती, मेणबत्त्या, सजावटीच्या वस्तू इत्यादी उत्पादनांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.