रुग्णवाहिकाचालकांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
नियमित वेतनासाठी संघटनेचे मुख्यमंत्री, मंत्र्यांना निवेदन
जव्हार, ता. २१ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य शासकीय रुग्णवाहिकाचालक कर्मचारी संघटनेने अल्प मानधन व प्रलंबित मागण्यांवरून राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला असून याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील ५६ वाहनचालक या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रमेश बर्डे यांनी दिली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २००५ पासून रुग्णवाहिकाचालक अल्प मानधनावर अखंडित सेवा बजावत असून त्यांना वाढत्या महागाईत उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. राज्यभरातील सुमारे तीन हजार चालक काम बंद करून चक्का जाम आंदोलनाच्या तयारीत असून त्यात पालघर जिल्ह्याचाही समावेश आहे. चालक २४ तास मुख्यालयात हजर राहून ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता अत्यावश्यक रुग्णसेवा देत असतानाही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून कार्यरत असलेल्या चालकांचा अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाचा वाटा असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. रुग्ण कल्याण समितीमार्फत नियुक्ती देऊन रात्रंदिवस सेवा घेतली जात असली तरी वारंवार पत्रव्यवहार करूनही शासनाने ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आकृतिबंध आराखड्यात रुग्णवाहिका चालकपद मंजूर असतानाही त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. या निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
------------
या आहेत प्रमुख मागण्या
राज्यातील सुमारे तीन हजार शासकीय रुग्णवाहिकाचालकांनी अल्प मानधनाऐवजी नियमित वेतनश्रेणी लागू करावी, सेवेला शासकीय दर्जा द्यावा व आकृतिबंधानुसार कायमस्वरूपी पदे भरावीत, अशी मागणी केली आहे. २४ तासांच्या सेवेसाठी भत्ते, विमा संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला असल्याचे जिल्हाध्यक्ष बर्डे, उपाध्यक्ष सचिन जाधव आणि सचिव रवींद्र चौधरी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.