कृषी उत्पन्न बाजार समितीला दणका
गाळ्यांच्या बांधकामावरील पणन महासंचालनालयाकडून स्थगिती कायम
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या फुल मार्केट व शेतकरी शेडच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या गाळ्यांच्या बांधकामाला पणन महासंचालनालयाने दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे. स्थगिती आदेश अस्तित्वात असतानाही बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आल्याने बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अडचणीत भर पडली आहे.
माजी संचालक मंडळ सदस्य मयूर पाटील यांनी याबाबत पणन महासंचालनालयाकडे तक्रार दाखल केली होती. बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची थेट विक्री करता यावी, यासाठी काही भूखंड आरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र, या जागेवर गाळे उभारण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे मयूर पाटील यांनी म्हटले आहे. तसेच बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित गाळ्यांची परस्पर विक्री केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे मयूर पाटील यांनी म्हटले आहे.
सुनावणीदरम्यान संचालक मंडळाकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्याचे आणि गाळे उभारण्यामागील उद्देश व शेतकऱ्यांना त्याचा नेमका कसा फायदा होणार, याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता न आल्याने पणन महासंचालनालयाने संचालक मंडळाला फटकारले व यापूर्वी दिलेल्या स्थगिती आदेशानंतरही काम सुरू असल्याची बाब तक्रारदारांनी निदर्शनास आणून दिली. तसेच, संबंधित सीसीटीव्ही फुटेज व इतर महत्त्वाचे पुरावे जतन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, फुल मार्केटचे बांधकाम पालिका प्रशासनाने अनधिकृत घोषित केल्यानंतरही ते काढून न टाकता काम सुरू असल्याचा दावा मयूर पाटील यांनी केला आहे. पणन विभागाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
समितीकडून आरोप फेटाळले
यासंदर्भात विचारणा केली असता संचालक समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले की, शेतकरी शेडप्रकरणी बाजू मांडण्यासाठी दिलेल्या मुदतीत सर्व कागदपत्रे सादर करता आली नसल्याने स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर कोणतेही बांधकाम सुरू नसल्याचा दावा त्यांनी केला.