श्रीवर्धनमध्ये २८ गावांत नळ कोरडेच
स्थानिक अडचणी, वाढीव खर्च व चुकीच्या तांत्रिक आराखड्यांमुळे ग्रामस्थांचे हाल
रवींद्र परवे ः सकाळ वृत्तसेवा
श्रीवर्धन, ता. २१ : केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ या घोषणेखाली राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनची श्रीवर्धन तालुक्यात दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाच्या नोंदीनुसार तालुक्यातील ६६ योजनांपैकी ३८ योजना १०० टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात उर्वरित २८ गावांमध्ये योजना विविध टप्प्यांवर रखडली आहे. अनेक ठिकाणी टाक्या उभ्या, पाइपलाइन टाकलेल्या पण नळातून पाण्याचा थेंबही येत नाही, अशी परिस्थिती आहे.
केंद्र सरकारने ‘हर घर जल’ या घोषणेखाली प्रत्येक गावात पाइपलाइनचे काम हाती घेतले आहे. परंतु श्रीवर्धनमधील २८ गावांमध्ये ही योजना विविध कारणांमुळे रखडली आहे. ही योजना रखडण्याचे मुख्य कारण चुकीचे तांत्रिक प्रस्ताव हे आहे. अनेक गावांत पाण्याचा स्रोत निश्चित न करताच विहिरी खोदल्या गेल्या. यामुळे काही दिवसांतच त्या कोरड्या पडल्या. काही ठिकाणी पायाभूत सुविधा तयार आहेत, परंतु पंप बसवणे किंवा वीजजोडणीमुळे पाणीपुरवठा प्रलंबित आहे. तसेच पावसाळ्यात कामे बंद राहणे आणि उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणे या दुष्टचक्रात ही योजना अडकली आहे. कामांच्या विलंबामुळे प्रकल्प खर्च वाढल्याची चर्चा असून, अंदाजपत्रकापेक्षा अधिक निधीची गरज भासत आहे.
दरम्यान, अनेक नळ योजनांमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. पाण्याच्या स्रोतांची अपुरी तपासणी, अंदाजपत्रकातील विसंगती आणि प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थितीशी विसंगत आराखडे यामुळे काही योजना सुरुवातीपासूनच अडचणीत आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर काही गावांत पूर्ण नोंद असूनही वितरण व्यवस्था सुरू नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. कागदोपत्री पूर्ण दाखविल्या जाणाऱ्या योजनांबाबतही ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
योजना रखडलेली २८ गावे
कुडकी, साखरोणे, कोलमांडले, कापोली, कार्ले, गाळसुरे, भट्टीचा माळ, वडवली, बापवन कांडणे, वेळास, जसवली, खरगाव, कोंढेपंचतन, आदगाव कुणबीवाडी, आराठी, कुडगाव, पांगळोली, वडघर, धनगरमलई, भरडखोल, बोलीपंचतन, दांडा, दिघी, हरवीत, मारल देवघर, काळिंजे, कुरवडे
निधीअभावी रखडल्या
काळिंजे, मारल आणि कुरवडे या योजना स्थानिक ग्रामपंचायत अडचणींमुळे रखडल्या आहेत. तर इतर योजना या निधीअभावी रखडल्या आहेत. आम्ही वरिष्ठ पातळीवर सुधारित आराखडा देऊन अधिक निधीची मागणी केली आहे. त्यानुसार उर्वरित कामे लवकर करू, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपाभियंता शेफाली देशमुख यांनी दिली.
गावात जलजीवन मिशन योजनेची चर्चा करण्यासाठी अधिकारी व ठेकेदार ग्रामसभेला येत नाहीत. ठेकेदाराला शासनाकडून पैसे मिळत नसल्याने काम बंद असल्याचे समजते. जे काम झाले आहे तेदेखील निकृष्ट दर्जाचे आहे. नवीन पाइपलाइनचा नकाशा सादर केला जात नाही. कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. जुने पाइप वारंवार फुटल्याने चार-पाच दिवस पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते.
- सुमित सावंत, ग्रामस्थ, बोर्लीपंचतन
छायाचित्र : बोर्लीपंचतन येथे पडलेले पाइप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.