रिक्षा प्रवाशांच्या तक्रारींसाठी आरटीओची विशेष मोहीम
कर्जत शहरातील रिक्षांना हेल्पलाईन स्टिकर
कर्जत, ता. २१ (बातमीदार) ः रिक्षा प्रवासादरम्यान प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कर्जत शहरात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील वाहनांची तपासणी करून अधिकृत तक्रार हेल्पलाईन असलेले स्टिकर रिक्षांवर लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना भाडे नाकारणे, गैरवर्तन किंवा अतिरिक्त भाडे आकारणीसारख्या प्रकारांविरोधात थेट तक्रार करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
आरटीओच्या पथकाने कर्जत शहरातील विविध रिक्षा स्टॅन्डवर भेट देत वाहनांची कागदपत्रे, परवाने, वाहनांची स्थिती आणि नियमांचे पालन होते का याची सखोल तपासणी केली. तपासणीनंतर पात्र वाहनांवर विशेष स्टिकर लावण्यात आले. ही मोहीम राबविताना पोलिस अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक संदीप कोतकर, आशुतोष दौंडे आणि परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासह प्रवाशांशी नम्र वर्तन ठेवण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, कर्जत शहरात रिक्षा प्रवाशांकडून भाडे नाकारणे व अतिरिक्त भाड्याबाबत अधूनमधून तक्रारी समोर येत असतात. या पार्श्वभूमीवर आरटीओने सुरू केलेली ही मोहीम प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार असून रिक्षा सेवेत शिस्त व पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. भविष्यातही अशा तपासणी मोहिमा सुरू राहणार असल्याचे परिवहन विभागाने संकेत दिले आहेत.
तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक
स्टिकरवर प्रवाशांसाठी तक्रार नोंदविण्याचे क्रमांक व सूचना स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. स्टिकरवर भाडे नाकारणे, प्रवाशांशी गैरवर्तन करणे, अतिरिक्त भाडे आकारणे अशा प्रकारच्या तक्रारींसाठी परिवहन विभागाचा व्हॉट्सॲप क्रमांक आणि टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. प्रवाशांनी कोणतीही अडचण आल्यास या क्रमांकांवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागाकडून आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खोटी तक्रार केल्यास गुन्हा
यासोबतच स्टिकरवर खोटी तक्रार करणे हा दंडनीय गुन्हा असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. खोटी माहिती देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने व वस्तुस्थितीवर आधारित तक्रारी कराव्यात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.