ठाण्यात धावत्या कारला आग
उड्डाणपुलावर थरार, चार प्रवासी थोडक्यात बचावले
ठाणे, ता. २१ : ठाणे पश्चिम येथील विवियाना मॉलसमोरील उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईकडे जाणाऱ्या या कारला नाशिक-मुंबई वाहिनीवर आग लागताच चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चारही प्रवासी वेळीच बाहेर पडले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. या भीषण आगीत कार मात्र पूर्णपणे खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक दरबार सिंग हे संभाजीनगरहून मुंबईतील मालाडच्या दिशेने आपल्या तीन प्रवाशांसह निघाले होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कार विवियाना मॉलजवळील उड्डाणपुलावर पोहोचली असताना, इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. क्षणातच आगीच्या ज्वाळांनी कारला वेढले. धूर दिसताच सिंग यांनी तातडीने कार थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. प्रवाशांनी धावत्या कारमधून बाहेर उड्या घेतल्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
घटनेचे गांभीर्य ओळखून दक्षता नावाच्या एका महिलेने तातडीने ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच राबोडी पोलिस, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक एका फायर इंजिन व रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी २० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीच्या रौद्र रूपामुळे कारचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता.
उड्डाणपुलावर भररस्त्यात कारने पेट घेतल्यामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी काही काळ या मार्गावरील वाहतूक थांबवली होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आग विझल्यानंतर आणि जळालेली कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.