विक्रमगडला वाहतूक कोंडीचा विळखा
अवजड वाहने, अतिक्रमणामुळे नागरिक हैराण
विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) : विक्रमगड शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, यामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक पुरते त्रस्त झाले आहेत. नगर पंचायत प्रशासनाने काही काळापूर्वी केलेली अतिक्रमणविरोधी कारवाई निष्फळ ठरली असून, पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
विक्रमगडमधून जव्हारकडे जाणारा हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. या मार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. या वाहनांमुळे बाजारपेठेच्या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी होते. अनेकदा ही अवजड वाहने शहराअंतर्गत रस्त्यांवरूनही धावतात. यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद
मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेली बेशिस्त दुकाने, फेरीवाले आणि अवैध पार्किंगमुळे रस्त्याची रुंदी कमालीची कमी झाली आहे. परिणामी लहान वाहने आणि पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागते. वाहतूक पोलिस तैनात असूनही नियमांचे उल्लंघन होत असल्याने शिस्तीचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.
सुरक्षा उपाययोजनांचा अभाव
वाढते अपघात रोखण्यासाठी या मार्गावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर), झेब्रा क्रॉसिंग आणि वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. संबंधित विभागाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
वाहनांची वेगमर्यादा कमी करण्यासाठी आवश्यक ठिकाणी पांढरे पट्टे आखले जातील. तसेच येत्या काही दिवसांत शासकीय मोजणी पूर्ण झाल्यावर हद्द निश्चित केली जाईल आणि मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
- विशाल मनाले, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ठाणे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.