तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : बेलापूर सेक्टर १५ येथे प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीच्या निर्णयावरून नव्याने वाद निर्माण झाला आहे. रुग्णालय उभारणीला विरोध नसला तरी निवडलेली जागा शहराच्या एका टोकाला असल्याने ठरावामध्ये फेरबदल करून प्रकल्प मध्यवर्ती ठिकाणी हलवावा, अशी मागणी नगरसेवक भरत भोईर यांनी केली आहे.
महापालिकेत नव्याने समविष्ट करण्यात आलेल्या १४ गावांच्या हद्दीत आजपर्यंत एकही शासकीय रुग्णालय नसल्याने येथील स्थानिकांची आरोग्य सेवेसाठी पायपीट होत आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने १४ गावांतील नागरिकांना डोंबिवली, मुंब्रा, ठाणे, कळवा, खारघर किंवा थेट पनवेल गाठावे लागते. किमान त्यांना २० ते २५ किमी पायपीट करावी लागते. सर्वाधिक फटका हा गर्भवतींना बसला जातो. एखाद्या महिलेला रात्री-अपरात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्यास नातेवाईकांना तारेवरची कसरत करत डोंबिवली किंवा पनवेल येथील रुग्णालय गाठावे लागते. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला १४ गावांतील लोकसंख्या ही ५० ते ६० हजारांच्या घरात असतानादेखील येथे कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा अद्याप उपलब्ध नाही. याच अनुषंगाने नगरसेवक भरत भोईर यांनी चौदा गाव परिसरात एखादे रुग्णालय उभे राहिले, तर नागरिकांना आरोग्यसेवेबाबत दिलासा मिळेल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
शहराच्या मध्यभागी सुविधा हवी
महापालिका क्षेत्रातील बाले ते बेलापूरदरम्यानचे अंतर सुमारे २० ते २५ किमी असल्याने प्रस्तावित हॉस्पिटल सर्व नागरिकांसाठी सहज उपलब्ध राहणार नाही, असा मुद्दा मांडण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत दूरच्या नागरिकांना उपचारासाठी अडचणी येऊ शकतात, असेही नमूद करण्यात आले.
नावाळी येथे पर्यायी जागेचा प्रस्ताव
शहराच्या मध्यवर्ती भागात रुग्णालय उभारल्यास अधिक नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळू शकतो, या भूमिकेतून १४ गाव परिसरातील नावाळी येथील सर्वे क्रमांक ११ मधील उपलब्ध जागा पर्यायी म्हणून निश्चित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या मागणीवर सोमवारी (ता. २३) महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
खेळाच्या मैदानाचा प्रश्न
सदर जागा ही अनेक वर्षांपासून खेळाचे मैदान म्हणून वापरात असून येथे क्रिकेटसह विविध क्रीडा उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. मैदानावर हॉस्पिटल उभारल्यास परिसरातील युवकांना क्रीडा सुविधा गमवाव्या लागतील, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे खेळाडू व नागरिकांनी या ठिकाणी बांधकामास विरोध दर्शविला आहे.
पालिका प्रशासनाने शहरातील माताबाल रुग्णालयाच्या धर्तीवर याठिकाणी रुग्णालय उभारावे, जेणे करून नागरिकांची होणारी पायपीट थांबली जाईल. शहरातील रुग्णालय हे एका टोकाला असल्याने येथील नागरिकांना ये-जा करण्यास त्रासदायक आहेत. १४ गावे ही ग्रामीण भागात मोडत असल्याने येथे आरोग्य सेवा महत्वाची आहे.
- भरत भोईर, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.