कोसबाडमध्ये बहरला ‘बिजली’चा मळा!
वाणगाव, ता. २१ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर्यायी व अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कोसबाडच्या प्रक्षेत्रावर मनमोहक बिजली फुलांच्या लागवडीचा प्रात्यक्षिक प्रयोग यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. आकर्षक पांढऱ्या रंगाची, झेंडूसारखी दिसणारी ही फुले पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी, महिला बचत गट सदस्य तसेच कृषी क्षेत्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असून, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम करते. त्याच उद्देशाने फुलशेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी बिजली या आकर्षक फुलांच्या लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे, असे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी माहिती दिली आहे. या प्रात्यक्षिकासाठी उत्तम प्रतीचे बियाणे निवडून रोपवाटिका तयार करण्यात आली. गादी वाफा तयार करून प्लॅस्टिक माल्चिंग तंत्रज्ञान वापरून २५ ते ३० दिवसांची रोपांची ३० गुणिले ३० सेंमी अंतरावर लागवड करण्यात आली. जमिनीची मशागत करताना शेणखत, सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य निचऱ्याची व्यवस्था करण्यात आली. ठिबक सिंचन आणि मल्चिंग तंत्रज्ञानामुळे तणनियंत्रण, पाणी बचत साधता आले तसेच कीड-रोग व्यवस्थापनामुळे पिकाची वाढ जोमदार झाली.
-------------
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
बिजली फुले टिकाऊ, आकर्षक आणि रंग न बदलणारी असल्यामुळे पूजा, सजावट, हार-माळा तसेच ड्राय फ्लॉवर उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. या फुलांची तोडणीनंतर टिकाऊ क्षमता जास्त असल्यामुळे वाहतुकीत नुकसान कमी होते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेसोबतच शहरी बाजारातही चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अशोक भोईर आणि प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा यांनी कमी खर्चात आणि कमी कालावधीत उत्पादन मिळणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे सांगितले.
------------
पारंपरिक पिकांसोबत फुलशेतीचा अवलंब केल्यास जोखीम कमी होते आणि उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतात. विशेषतः लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी हे पीक पूरक व्यवसाय ठरू शकते. प्रयोगामुळे परिसरात फुलशेतीबाबत नवीन दृष्टिकोन निर्माण झाला असून भविष्यात बिजली फुलांची लागवड शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाची संधी ठरू शकते.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.