खासदार राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी
काळे झेंडे दाखविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध
भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : सोनाळे येथे २०१४ मध्ये एका प्रचारसभेदरम्यान महात्मा गांधींच्या हत्येस ‘आरएसएस’ जबाबदार असल्याचे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी यांनी केले होते. याविरोधात ‘आरएसएस’चे तत्कालीन शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी जामीन देण्यासाठी शनिवारी (ता. २१) लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली.
‘आरएसएस’चे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात संघटनेची बदनामी झाल्याबद्दल फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात ‘राहुल गांधी यांनी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन झाल्याने नव्याने जामीनदार सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नव्याने जामीनदार म्हणून नोंद भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयात न्या. पी. एम. कोळसे यांच्यासमोर करण्यात आली आहे,’ अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील ॲड. नारायण अय्यर यांनी दिली आहे. तर याचिकाकर्ते राजेश कुंटे यांच्या वतीने ॲड. प्रबोध जयवंत यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात राजेश कुंटे यांची सरतपासणी आणि उलटतपासणी झालेली आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे पोलिस अधिकारी अशोक सायकर यांची सरतपासणी नोंदविलेली आहे, असेही अय्यर यांनी सांगितले. तर न्यायालयाकडून पुढील सुनावणी ४ एप्रिल ठेवण्यात आल्याची माहिती ॲड. प्रबोध जयवंत यांनी दिली आहे. या सुनावणीवेळी न्यायालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार रईस शेख यांसह काही प्रमुख काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. गांधी यांच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
काळे झेंडे दाखविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध
‘मुलुंड टोलनाका परिसरात राहुल गांधी यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले हे अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे सर्वांना माहीत आहे, याठिकाणी काहीही विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती, त्यामुळे सरकारचा व पोलिस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी दिली. त्यांच्यासोबत भिवंडीचे उपमहापौर तारिक मोमीन यांनीदेखील या घटनेचा निषेध केला.
ठाण्यात निषेध आंदोलन
ठाणे : नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. टेंभी नाका येथील आनंद आश्रम परिसरात झालेल्या या आंदोलनात शिवसेना ठाणे जिल्हा शाखेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या अलीकडील वक्तव्यांचा तसेच दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एआय परिषदेदरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यात आला. खासदार म्हस्के यांनी सांगितले, की देश सध्या विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले जात असून भारताची जागतिक पातळीवर प्रतिष्ठा वाढत आहे. अशा वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांदरम्यान निदर्शने करून देशाची प्रतिमा मलिन करणे चुकीचे आहे. मतभेद असू शकतात; मात्र देशाच्या सन्मानाला बाधा पोहोचेल, अशी कोणतीही कृती योग्य नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.