मेट्रो-२बी मार्गावर यू गर्डरची उभारणी
कुर्ला-हलाव पुलावर रखडलेले काम आता मार्गी लागणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : एमएमआरडीएने मुंबई मेट्रो लाइन २बी (डीएननगर-मंडाळे)अंतर्गत कुर्ला येथील हलाव पुलावर शनिवारी (ता. २१) पहाटे ४ वाजता दोन यू गर्डरची यशस्वी उभारणी केली. गेल्या अनेक महिन्यांपासून लटकलेले हे काम मार्गी लागल्याने मेट्रो-२ बीच्या कामाला आता चालना मिळणार आहे.
मेट्रो लाइन २बी हा महत्त्वाचा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर असून, डी.एन.नगर, बीकेसी, कुर्ला, चेंबूर व मंडाळे या प्रमुख निवासी व व्यापारी केंद्रांना जोडणारा मार्ग आहे. दरम्यान, हलाव पूल परिसर विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याने मेट्रो व्हायाडक्ट व विद्यमान पूल यांच्यामधील उभ्या अंतराची मर्यादा केवळ ३.५ मीटर आहे. या तांत्रिक मर्यादांचा विचार करून संबंधित यंत्रणांची आवश्यक मंजुरी प्राप्त केल्यानंतर काम अत्यंत अचूक नियोजनाद्वारे सुरळीतपणे पूर्ण करण्यात आले. सार्वजनिक सोयीचा विचार करून ही उभारणी प्रक्रिया वाहतूकदृष्ट्या व्यस्त असलेल्या या परिसर असल्याने रात्रीच्या वेळी पार पाडण्यात आली. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी झाले. जड यंत्रसामग्रीचे कार्यक्षम नियोजन शक्य झाले. हलाव पुलावरून रिक्षा, टॅक्सी, टेम्पो व रुग्णवाहिका अशा हलक्या वाहनांची ये-जा सुरू असून जड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.
२० मीटर लांबीचे दोन गर्डर
हलाव पूल येथे प्रत्येकी २० मीटर लांबीचे दोन यू गर्डर ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली उभारण्यात आले. हा टप्पा पूर्ण झाल्याने आता ट्रॅक बसविणे, ओव्हरहेड कॅटेनरी प्रणाली, वीजपुरवठा व्यवस्था व दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणी, अशी कामे हाती घेणे शक्य होणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.