तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव तत्काळ देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे. विमानतळाच्या नामकरणाच्या मागणीसाठी उद्या सोमवारी (ता. २३) मुंबईतील आझाद मैदान येथे ‘चलो आझाद मैदान’च्या घोषणेसह लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यानंतरही नामकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. तरीदेखील विमानतळाच्या नामकरणात पाटील यांचे नाव जाहीर न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये असंतोष वाढल्याचे समितीने स्पष्ट केले.
सर्वपक्षीय कृती समितीने, सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. या आंदोलनात कृती समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नवी मुंबई, उरण, पनवेल, ठाणे, रायगड, पालघर, तसेच नाशिक परिसरातून हजारो भूमिपुत्र मुंबईकडे रवाना होणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.