युवासेनात नव्या नियुक्त्या जाहीर
लोणेरे विभाग प्रमुखपदी प्रसाद मांजरे; कुंभारआळी–पहेल शाखाप्रमुखपदी नारायण केसरकर
माणगाव, ता. २२ (वार्ताहर) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने युवासेनात पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार लोणेरे विभाग युवासेना प्रमुखपदी प्रसाद मांजरे, तर कुंभारआळी–पहेल शाखा प्रमुखपदी नारायण केसरकर यांची निवड करण्यात आली.
नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात येऊन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसैनिक व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. घोषणाबाजी करत नव्या पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
प्रसाद मांजरे यांनी गावोगावी युवकांना संघटनेशी जोडून संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला. युवकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नारायण केसरकर यांनी शाखास्तरावर सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
फोटो ओळ : मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना.