दर्जेदार आंबा उत्पादनासाठी पीक व्यवस्थापन गरजेचे
कीटक शास्त्रज्ञ डॉ. अंकुर ढाणे यांचे किसान गप्पागोष्टी कार्यक्रमात प्रतिपादन
वाणगाव, ता. २२ : आंबा पिकात सध्या फळधारणा होऊन फळे वाढीच्या अवस्थेत असताना तुडतुडे, मिज माशी, खोड किडा तसेच भुरी व फांदेमर या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मोहर संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे असून, दर्जेदार उत्पादनासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. अंकुर ढाणे यांनी केले. रामबाग, सफाळे येथे परिसर सेवा व विकास मंडळ सफाळे, आत्मा पालघर व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किसान गप्पागोष्टी कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात आंबा मोहर संरक्षण, घरच्या घरी फळमाशीचे सापळे तयार करण्याची पद्धत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी प्रसारित केलेल्या मोहर संरक्षण वेळापत्रकाची माहितीही देण्यात आली. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणावर भर द्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बागूल यांनी केले. कृषी अधिकारी नंदा चौधरी यांनी महाविस्तार एआय ॲप वापराबाबत मार्गदर्शन केले, तर सहाय्यक कृषी अधिकारी हेमंत अधिकारी यांनी विविध योजनांची माहिती दिली. आत्मा प्रकल्पाच्या कामांचा आढावा मनोज वाकळे यांनी घेतला. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------
कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन
या वेळी डॉ. अंकुर ढाणे यांनी आंबा मोहर संरक्षण व घरच्या घरी फळमाशीचे सापळे तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. बा. सा. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी प्रसारित केलेल्या आंबा मोहर संरक्षण वेळापत्रकाचीही त्यांनी माहिती दिली. शेतीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व यांत्रिकीकरणावर भर देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.