सीवूड्स स्थानकावर प्रवेशद्वार उभारण्याची मागणी
फेरीवाल्यांच्या उच्छादामुळे प्रवासी त्रस्त
बेलापूर, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील सीवूड्स दारावेच्या पूर्वेकडील प्रवेशमार्गावरील गैरसोयींमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकात प्रवेश करताना फेरीवाल्यांचा उच्छाद, मोडकळीस आलेले साहित्य, रिक्षा स्टँडची गर्दी आणि नियोजित प्रवेशद्वाराचा अभाव यामुळे दररोज शेकडो प्रवाशांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
या स्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात; मात्र पूर्वेकडील बाजूस सिडकोकडून कोणतेही अधिकृत प्रवेशद्वार किंवा दिशादर्शक फलक उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना चिंचोळ्या आणि अडथळ्यांनी भरलेल्या मार्गातून स्थानकात प्रवेश करावा लागतो. फेरीवाल्यांच्या सामानामुळे पादचाऱ्यांना चालण्यासही जागा राहत नाही.
सीवूड्स दारावे स्थानक सर्व बाजूंनी बंदिस्त व भव्य रचनेचे असल्याने पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. रात्रीच्या वेळी प्रवाशांची वर्दळ कमी होताच स्थानक परिसरात गर्दुल्ले आणि संशयित व्यक्तींचा मुक्त वावर दिसून येतो. आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांची संख्या अत्यल्प असल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. एखादी अनुचित घटना घडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांनी या ठिकाणी अधिकृत प्रवेशद्वार उभारणे, फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे, दिशादर्शक फलक बसविणे तसेच सुरक्षा वाढविण्याची मागणी संबंधित प्रशासनाकडे केली आहे. पूर्वेकडील प्रवेशमार्गावरील अनधिकृत फेरीवाले व अपुरा पोलिस बंदोबस्त यामुळे सीवूड्स दारावे स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट
स्थानकाला नामफलक नाही
सिडकोने नवी मुंबईतील सर्व स्थानकांना प्रवेशद्वार आणि नामफलक लावले आहेत. स्थानक प्रवेश सहज ओळखता येते, मात्र सीवूड्स स्थानकात एलएनटी इमारतीच्या अंतर्गत असणाऱ्या या स्थानक प्रवेशाची ओळख पटत नसून, त्यासाठी नामफलकदेखील नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.