घाटकोपरमधील वाईन शॉपसमोर भररस्त्यात मद्यपान; कारवाईची मागणी
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) : घाटकोपर परिसरातील वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून दुकानासमोरच भररस्त्यात उभे राहून मद्यपान करण्याचे प्रकार वाढत असल्याची तक्रार पुढे आली आहे. यामुळे महिला, लहान मुले, शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी पंतनगर पोलिसांकडे केली आहे.
यासंदर्भात मेहता यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात निवेदन सादर करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्राहक दुकानातून मद्य विकत घेऊन समोरील मोकळ्या जागेत उभे राहून मद्यपान करतात, अशा अनेक तक्रारी त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकासमोरील ‘ब्लू बेल वाईन शॉप’जवळ मुख्य रस्ता आणि मोकळी जागा असून, गर्दीच्या वेळी येथे मद्यपानाचे प्रकार घडत असल्याची माहिती आहे. तसेच पश्चिमेकडील मेट्रो पुलाखालील वाईन शॉप परिसरातही अशीच स्थिती असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकरनगर येथील ‘मॅजेस्टिक वाईन शॉप’समोर रात्रीच्या वेळी मोठी गर्दी होत असल्याची तक्रार आहे.
या भागातील मुख्य रस्त्यावर बाजारासाठी मोठ्या संख्येने महिला ये-जा करीत असतात. अशा रहदारीच्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांची गर्दी होत असल्याने अनेकदा वादावादीचे प्रकार घडत असल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी भररस्त्यात मद्यपान करणाऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडल्याचीही माहिती समोर आली आहे. घाटकोपर परिसरातील सर्व वाईन शॉपसमोर होणारे खुले आम मद्यपान रोखण्यासाठी नियमित पोलिस गस्त वाढवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.