अतिक्रमणामुळे सिडको बायपासचे काम रखडले!
वाहतूक कोंडीचा विळखा कायम; प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संताप
बोईसर, ता. २३ (बातमीदार) : बोईसरमधील वाहतूक कोंडीवर जालीम उपाय ठरू पाहणाऱ्या ''सिडको बाह्यवळण'' (बायपास) रस्त्याच्या कामाला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. १२७ मीटर सिमेंटीकरणाच्या कामापैकी ८५ मीटरचे काम पूर्ण झाले असले, तरी उर्वरित ४२ मीटरच्या पट्ट्यात असलेल्या अतिक्रमणामुळे काम ठप्प झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा अडथळा दूर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नगरविकास विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली ''कृतिका कन्स्ट्रक्शन''मार्फत हे काम सुरू आहे. ओस्तवालपासून सुरू झालेले काम सिडकोकडे जोडणाऱ्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या ४२ मीटरच्या भागात असलेल्या अतिक्रमणामुळे यंत्रणा हतबल झाली आहे. यासोबतच मार्गात येणारी काही झाडेही अडथळा ठरत असून, त्यांच्या पुनर्रोपणाचा प्रश्नही प्रलंबित आहे.
बोईसर रेल्वे स्थानक, बसस्थानक, नवापूर नाका ते ओस्तवाल परिसरात दररोज होणारी भीषण वाहतूक कोंडी नागरिकांच्या जीवावर आली आहे. सिडको बाह्यवळण रस्ता पूर्ण झाल्यास मुख्य रस्त्यावरील जड वाहतूक या मार्गे वळवता येईल; मात्र अत्यल्प काम शिल्लक असूनही ते पूर्ण होत नसल्याने पर्यायी मार्ग असूनही प्रवाशांना तासनतास कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
सिडको बाह्यवळण रस्त्याच्या कामात काही ठिकाणी झाडे अडथळा ठरत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून या झाडांची पुनर्लागवड करण्यासाठी आम्ही वनविभागाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. रस्ता सरळ आणि सुरक्षित झाल्यास अपघातांचा धोकाही टळेल.
-कमलेश संखे (ग्राम विस्तार अधिकारी)
केवळ ४२ मीटर कामासाठी एवढा मोठा प्रकल्प रखडणे दुर्दैवी आहे. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, सिडको आणि ग्रामपंचायतीशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाने आता कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कारवाई करून रस्ता खुला करावा.
-अतुल देसाई (स्थानिक नागरिक)
महत्त्वाचे मुद्दे :
प्रलंबित काम : ४२ मीटर (अतिक्रमणामुळे).
पूर्ण झालेले काम : ८५ मीटर.
अडथळे : अनधिकृत बांधकामे आणि वृक्ष पुनर्रोपण.
मागणी : अतिक्रमण हटवून रस्ता तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.