दर्गा-कब्रस्तान मार्ग अंधारात
नादुरुस्त पथदिव्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न; नागरिकांत भीतीचे वातावरण
कर्जत, ता. २३ (बातमीदार) : कर्जत शहरातील दर्गा व कब्रस्तानाकडे जाणारा मार्ग सध्या पूर्णपणे अंधाराच्या विळख्यात सापडला असून, बंद पडलेल्या विद्युत पथदिव्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायंकाळनंतर रस्त्यावर काळोख पसरत असल्याने येथे ये-जा करणाऱ्यांमध्ये विशेषतः मुस्लिम बांधवांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील शनी मंदिर परिसरापासून उल्हास नदीकिनारी अनेक वर्षांपूर्वी कब्रस्तान व दर्गा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी नगर परिषदेने रस्त्यावर पथदिवे बसविले होते; मात्र मागील काही दिवसांपासून ते बंद अवस्थेत असल्याने संपूर्ण मार्ग अंधारमय झाला आहे. रस्त्याच्या एका बाजूला उल्हास नदी तर दुसऱ्या बाजूला रेल्वे मार्ग असल्याने येथे वर्दळ कमी असते. अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटकांकडून मद्यपान, नशा व भांडणाचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे दफनविधीसाठी किंवा दर्ग्यात जाणाऱ्या नागरिकांना भीतीच्या वातावरणात ये-जा करावी लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधत नगरसेवक अँड. रोहित ओसवाल यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी केली आहे.
चौकट
तातडीची दुरुस्ती आणि सुरक्षा उपायांची गरज
धार्मिक स्थळाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे कायमस्वरूपी प्रकाशव्यवस्था, नियमित देखभाल व गस्त वाढविणे आवश्यक आहे. पथदिवे सुरू करण्यासोबतच सीसीटीव्ही बसविणे व समाजकंटकांवर कारवाई केल्यास नागरिकांची भीती दूर होऊन सुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.