उल्हासला प्रदूषणाचा विळखा
नदीत दररोज ३५७ एमएलडी सांडपाणी
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २३ : उल्हास नदीतून दररोज कोट्यवधी लिटर पाणी उपसले जाते आणि त्याच नदीत शेकडो एमएलडी सांडपाणी परत सोडले जाते. या भयावह वास्तवाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरकरांना दिले जाणारे पाणी नेमके शुद्ध आहे की सांडपाणी आहे, असा संतप्त सवाल आज नागरिक उपस्थित करत आहेत. पाणी दूषित, नदी प्रदूषित आणि तरीही पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा हा अन्यायकारक प्रकार आता उघडपणे समोर आला आहे.
महाराष्ट्र जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार उल्हास नदीतून विविध प्रशासकीय संस्था, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायती, रिसॉर्ट तसेच औद्योगिक कंपन्यांकडून दररोज तब्बल १,७१६ एमएलडी पाणी उपसले जाते. दुसरीकडे, महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार याच उल्हास नदीत ३५७ एमएलडी सांडपाणी दररोज सोडले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या दोन आकड्यांचा एकत्रित विचार करता, उल्हास नदीतील पाण्यापैकी सुमारे २५ टक्के पेक्षा अधिक पाणी हे सांडपाणी व केमिकलयुक्त व अशुद्ध स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट होते. म्हणजेच, ज्या नदीवर संपूर्ण परिसराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे, ती नदीच आज प्रदूषणाच्या गर्तेत अडकलेली आहे. यामुळे केवळ नदीचे नैसर्गिक अस्तित्वच नव्हे, तर लाखो नागरिकांचे आरोग्यही थेट धोक्यात आले आहे.
अलीकडेच उल्हासनगर महापालिकेने पाणीपट्टीत वाढ करण्याचा घेतलेला निर्णय संतापजनक ठरत आहे. पालिका एमआयडीसीकडून पाणी खरेदी करून ते नागरिकांना पुरवते; मात्र उल्हास नदीत मिसळणारे सांडपाणी कमी करण्यासाठी पालिकेकडून कोणती ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवली जाते का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
केवळ संवर्धनाच्या घोषणाच
उल्हास नदी स्वच्छतेसाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी, प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि नागरिकांना खरोखर शुद्ध पाणी मिळेल याची हमी देणे, ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त जबाबदारी आहे. अन्यथा, “जलसंवर्धन” आणि “स्वच्छ नदी” हे शब्द केवळ घोषणांपुरते मर्यादित राहतील आणि नागरिकांच्या आरोग्याची किंमत मात्र दिवसेंदिवस वाढतच जाईल, अशी तीव्र भावना शहरभर व्यक्त होत आहे.
उल्हास नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर लाखो नागरिकांच्या आरोग्याची जीवनरेषा आहे. आज या नदीत २५ टक्क्यांपेक्षा अधिक सांडपाणी व केमिकलयुक्त पाणी मिसळत असेल, तर ही प्रशासनाची घोर अपयशाची कबुली आहे. एकीकडे नदी प्रदूषित ठेवायची, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कागदावरच ठेवायचे आणि दुसरीकडे नागरिकांना शुद्ध पाण्याच्या नावाखाली दरवाढीचा बोजा टाकायचा हा सरळसरळ अन्याय आहे. नागरिकांचेच मलमूत्र प्रक्रिया करून तेच पाणी पुन्हा त्यांच्याच घशात घालणे आणि त्यासाठी पैसे वसूल करणे अमानवी आहे. उल्हास नदी स्वच्छ करण्यासाठी ठोस कृती झाली नाही, तर हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
- शशिकांत दायमा, पर्यावरणप्रेमी
मंजूर पाणी वापर
संस्थेचे नाव मंजूर पाणी कोटा (दललि/दिन)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण १४०.०००
स्टेम, ठाणे ३१६.०००
कल्याण-डोंबिवली महा ३२०.०००
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ९०४.०००
एकूण १६८०.०००
ग्रामपंचायत वापर
ग्रामपंचायत मंजूर पाणी (दल/दिन)
वांगणी ०.२८०
गोरेगाव ०.०५३
सावरे ०.११५
कासगाव ०.०५६
चोण ०.०४७
डोणे ०.०४९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.