ठाणे महापालिकेत ‘चावी’ नाट्य
शानू पठाण यांचा विरोधी पक्षनेते कार्यालयासाठी संघर्ष
ठाणे : ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अपेक्षेप्रमाणे शरद पवार गटाचे शालू पठाण यांची नियुक्ती सोमवारी (ता. २३) महासभेत जाहीर झाली. त्यानंतर त्यांना कार्यालय खुले करण्यासाठी चावीचा शोध घ्यावा लागल्याची माहिती समोर आली. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चावी सापडत नसल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाकडून विरोधी पक्षनेतेपदाच्या कार्यालयाची चावी घेऊन शानू पठाण यांनी कक्षामध्ये प्रवेश केला. या कक्षावर शिंदे सेनेकडून दावा करण्यात आला होता.
सोमवारी महासभेत शानू पठाण यांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा करण्यात आली. त्यानंतर मागील वेळेस विरोधी पक्षनेतेपदासाठी जे कार्यालय देण्यात आले होते, त्या कार्यालयात शानू पठाण यांनी जाण्याची तयारी केली; परंतु त्या कार्यालयाला टाळे लागलेले होते. त्यानंतर कार्यालयाच्या बंद टाळ्याच्या चावीचा शोध घेण्याची मोहीम शरद पवार गटाकडून महापालिकेत सुरू झाली. त्यानंतर त्यांनी चावीसंदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता, चावी सापडत नसल्याचे उत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले. यासंदर्भातील माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हरवलेली चावी सापडली. त्यानंतर शानू पठाण यांनी शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत कार्यालयात प्रवेश केला.
शिंदे गटाने केला होता दावा
विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला होता. शिंदे गटाचे अधिकचे नगरसेवक निवडून आले असल्याने विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयासह त्या बाजूला असलेले कार्यालयदेखील उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती. याची माहिती शरद पवार गटाला मिळाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडूनदेखील कार्यालयाचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. परंतु शिंदे गटदेखील त्या कार्यालयाचा दावा घेण्यासाठी ठाम असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे ते कार्यालय खुलेदेखील करण्यात आले नव्हते. दुसरीकडे सभागृह नेते, गटनेते आदींसह विविध पक्षांची कार्यालये साफसफाई करून स्वच्छ करण्यात आले होते. परंतु विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाकडे दुर्लक्ष झाले होते. अखेर सोमवारी शरद पवार गटाने कार्यालयाचा ताबा घेतला.
रस्त्यावरची लढाई आम्ही लढू
सभागृहातील लढाई शानू पठाण लढतील आणि रस्त्यावरची लढाई आम्ही लढू, असे या वेळी शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी स्पष्ट केले. सत्ताधाऱ्यांकडून चांगली कामे झाली तर त्यांचे कौतुक करू, पण ते जनतेच्या हिताला बाधा आणत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.