ठाणे महापालिकेत पहिल्याच महासभेत तुफान गोंधळ;
१० मिनिटांत १९ विषय मंजूर; प्रशासकीय काळातील कामांवरून विरोधक आक्रमक; उपमहापौरांचा राजीनाम्याचा इशारा
ठाणे, ता. २३ : मागील चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा सोमवारी प्रचंड गदारोळात पार पडली. प्रशासकीय काळातील कामांचा सविस्तर लेखाजोखा आणि श्वेतपत्रिकेची मागणी करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांच्या मागणीला केराची टोपली दाखवत, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि प्रशासनाने अवघ्या १० मिनिटांत पटलावरील सर्व १९ विषय मंजूर केले. या दडपशाहीचा निषेध करत भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी थेट पदाचा राजीनामा देऊन विरोधी बाकावर बसण्याचा इशारा दिल्याने महायुतीतील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
गेल्या गुरुवारी तहकूब झालेली सभा सोमवारी पुन्हा सुरू झाली. सभेत स्थायी समिती सदस्य, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांची निवड प्रक्रिया पार पडली. त्यानंतर खऱ्या अर्थाने वादाला तोंड फुटले. भाजपच्या मृणाल पेंडसे, नम्रता कोळी आणि शरद पवार गटाचे सुधीर भगत यांनी प्रशासकीय राजवटीत झालेल्या कामांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. सुधीर भगत यांनी तर या कालावधीतील कामांची ''श्वेतपत्रिका'' काढण्याची मागणी केली; मात्र महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रश्नोत्तरांचा भाग न घेता थेट विषयपत्रिकेवरील कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले.
विरोधकांचा गोंधळ सुरू असतानाच, महापौरांच्या सूचनेनुसार प्रशासनाने काही मिनिटांत जलवाहिनी, दूषित पाणी उपाययोजना यांसारख्या १९ महत्त्वाच्या विषयांचे वाचन करून ते मंजूर केल्याचे घोषित केले. या प्रकारामुळे सभागृहात प्रचंड तणाव निर्माण झाला. विशेष म्हणजे, या गोंधळाच्या वातावरणातच अचानक राष्ट्रगीत सुरू झाल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला. महापौरांना राष्ट्रगीत सुरू झाल्याचे क्षणभर लक्षात न आल्याने सहकाऱ्यांनी त्यांना उभे राहण्याची सूचना केल्याची घटनाही या वेळी घडली.
पारदर्शकता हा आमचा अजेंडा आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर केले जात आहेत. हा चुकीचा पायंडा असून, आम्ही याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करू. चुकीच्या गोष्टींचा पायंडा पाडला जात असून, ''गोल्डन गँग''चा अजेंडा चालू देणार नाही. वेळ पडल्यास उपमहापौर पदाचा राजीनामा देऊन विरोधी बाकावर बसू.
- कृष्णा पाटील (उपमहापौर, भाजप)
सभागृह हे सदस्यांना चर्चेसाठीच आहे. महापौरांनी विनंती केल्यानुसार कामकाज झाले. मात्र, सभागृहात कोणाचीही गळचेपी झालेली नाही. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असून, तो कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. महापौर, उपमहापौर आणि सर्व गटनेत्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतले जातील.
- हणमंत जगदाळे (सभागृह नेते)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.