पोलिस भरतीसाठी उमेदवाराकडून
उत्तेजक द्रव्याचा वापर
भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : मिरा भाईंदर, वसई विरार पोलिस आयुक्तालायासाठी सुरू असलेल्या भरतीदरम्यान एका उमेदवाराने इंजेक्शनच्या सहाय्याने उत्तेजक द्रव्य घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या उमेदवारावर सोमवारी (ता. २३) गुन्हा दाखल करून त्याला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली.
पोलिस शिपाई आणि चालक अशा ९२१ पदांच्या भरतीसाठी २० फेब्रुवारीपासून भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे मैदानी चाचणी सुरू आहे. सोमवारी (ता. २३) मैदानावर साधारण २,५०० उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. सर्व उमेदवारांची संपूर्ण तपासणी करून त्यांना शरीरिक चाचणीच्या पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येत होते. पोलिसांचे अमली पदार्थ तपासणी पथक मैदानामध्ये साध्या वेशात गस्त घालत असताना उमेदवारांसाठी असलेल्या तंबूच्या मागील बाजूस आडोशाला उभा राहून एक उमेदवार दंडामध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने उत्तेजक द्रव्य घेत असल्याचे पथकाला आढळले. या उमेदवाराला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या विरोधात भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिस भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले.
संपूर्ण पोलिस भरतीचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करण्यात येत आहे. अमली पदार्थ तपासणीकरिता साध्या वेशात दोन फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत. शारीरिक चाचणीदरम्यान कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये अथवा गैरकृत्य करू नये. तसे निदर्शनास आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.