खडेगोळवलीत गुंडांचा उच्छाद
गाड्यांची तोडफोड अन् सीसीटीव्ही नष्ट; नागरिक आक्रमक!
कल्याण, ता. २४ (बातमीदार) : विठ्ठलवाडीजवळील खडेगोळवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरी आणि नशेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. वारंवार होणाऱ्या तोडफोडीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या गुंडगिरीला कायमचा आळा घालण्यासाठी आज परिसरातील त्रस्त नागरिकांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर धडक दिली. खडेगोळवलीतील साईनगर, औदावराम नगर, आत्माराम नगर आणि कैलास नगर या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे. गेल्या ४८ तासांत घडलेल्या घटनांनी नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला आहे.
साईनगर आणि औदावराम नगर येथे अज्ञात गुंडांनी उभ्या गाड्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. आपली ओळख लपवण्यासाठी समाजकंटकांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तोडून टाकले आहेत. उघडपणे फिरणारे नशेखोर आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे महिला व लहान मुलांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे येथील नगरिक दहशतीखाली आहेत. मंगळवारी (ता. २४) नागरिकांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर, न्हायदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिसरात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
नागरिकांच्या मागण्या
खडेगोळवलीत गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस चौकीची मागणी प्रलंबित आहे. ती तातडीने कार्यान्वित करावी, परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्यात यावी. तोडफोड करणाऱ्या आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई व्हावी, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.