जव्हारमध्ये मोजणी ठप्प
भूमी अभिलेख संपाचा फटका; खरीप हंगामाच्या तोंडावर नागरिक चिंतेत
जव्हार, ता. २४ (बातमीदार) : जव्हार तालुक्यात भूमी अभिलेख विभाग कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनामुळे जमीन मोजणीची कामे गेल्या १० दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या बेमुदत संपाचा फटका आदिवासी व ग्रामीण नागरिकांना बसत असून, सुमारे १०० प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत.
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर मोजणी रखडल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. पावसाळ्यापूर्वी शेतीसाठी आवश्यक मोजणी न झाल्यास शेतीकामे अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संप लवकर न सुटल्यास अनेकांना दिवाळीनंतरच मोजणीची प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जमीन मोजणीसाठी शुल्क भरूनही कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कार्यालयात वारंवार फेऱ्या मारूनही ठोस उत्तर मिळत नसल्याची तक्रार होत आहे.
------------------
अपुरी कर्मचारी संख्या
आर्थिक व्यवहार, खरेदी-विक्री आणि बांधकाम परवान्यांवरही परिणाम झाला आहे. विभागाचे काम वाढत असताना कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे रवींद्र निकम यांनी सांगितले. सातव्या वेतन आयोगाच्या तांत्रिक वेतन श्रेणीप्रमाणे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे कामाचा ताण वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
-------------------
मला पिंपूर्णा येथील जागेची मोजणी करायची आहे. त्यासाठी ऑनलाइन चलन भरावे लागणार आहे. मात्र, भूमी अभिलेख कार्यालयाचा संप असल्यामुळे माझे काम अर्धवट राहिले आहे.
- तन्जिम शेख, पिंपूर्णा
------
मी गेल्या आठ दिवसांपासून जव्हारच्या भूमी अभिलेख कार्यालयात माझी जमीन मोजणी व्हावी यासाठी येत आहे. त्यासाठी माझा रोजगार बुडतो, जनावरांना चारा न देता मी येतो. प्रवासाचा खर्चही वाया जातो. उपासमारदेखील होते. एवढे करूनही जव्हारला आल्यावर काम होत नाही.
- सदू अंधेर, किरमिरा
जव्हार : भूमी अभिलेख कार्यालयात नागरिक वारंवार फेऱ्या मारत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.