हरिहरेश्वर-अक्कलकोट बससेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
तोट्यातील लांब पल्ल्याच्या गाड्यांऐवजी स्थानिक व पर्यटनवाढीस चालना देणाऱ्या मार्गांना प्राधान्य द्यावे
श्रीवर्धन, ता. २४ (वार्ताहर) : श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनवाढ व स्थानिक प्रवाशांची सोय लक्षात घेता श्रीवर्धन आगारातून हरिहरेश्वर-श्रीवर्धन-अक्कलकोट ही बस कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे. आगाराकडून सध्या सुरू असलेल्या लातूर व बीड या तोट्यातील बससेवा बंद करून त्याऐवजी हरिहरेश्वर-अक्कलकोट तसेच श्रीवर्धन-पुणे बस सुरू कराव्यात, अशी मागणी आगारप्रमुख महिबूब मणेर यांच्याकडे करण्यात आली. आगाराच्या उत्पन्नासाठी लांब पल्ल्याची एक बस सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे आगारप्रमुखांनी स्पष्ट केले असले, तरी प्रवाशांनी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे.
दरम्यान, श्रीवर्धन आगारातील मुंबईकडे जाणाऱ्या बसगाड्यांना नागोठणे ते खारपाडादरम्यान दिलेल्या अतिरिक्त थांब्यांबाबतही प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे. एका कर्मचाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त तांत्रिक कर्मचाऱ्याच्या प्रभावामुळे हे थांबे देण्यात आल्याची चर्चा आहे.
चौकट
स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष
प्रवासीवर्गाच्या मते पर्यटनस्थळ हरिहरेश्वरला जोडणारी बससेवा सुरू झाल्यास आगाराला उत्पन्न मिळण्याबरोबरच स्थानिक प्रवासी व भाविकांची मोठी सोय होईल. तोट्यातील मार्गांऐवजी प्रवासीसंख्या असलेल्या मार्गांना प्राधान्य दिल्यास आगार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.
( फोटो - बससेवेसंदर्भात आगारप्रमुखांना निवेदन देताना श्रीवर्धन येथील प्रवासीवर्ग.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.