विदेशी पर्यटकांच्या रील्समधून रेल्वेवर टीका
कचरा, अतिक्रमणाचे व्हिडिओ व्हायरल; हे स्थानक की कचराकुंडी?
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्डकपमुळे विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक मुंबईसह विविध शहरांत दाखल झाले आहेत; मात्र मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छता आणि रुळांजवळील अतिक्रमणाचे व्हिडिओ परदेशी पर्यटकांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने भारतीय रेल्वे व्यवस्थेची आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकाच्या रुळांजवळील झोपडपट्टी, प्लॅटफॉर्मवरील कचऱ्याचे ढीग आणि रुळांजवळ साचलेली घाण याची दृश्ये काही पर्यटकांनी मोबाईलमध्ये चित्रित केली आहेत. ही रील्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत, असून मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्थेबाबत टीकेची लाट उसळली आहे. जुनस राथाला या परदेशी पर्यटकाने आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये म्हटले आहे, मी सध्या एका भारतीय रेल्वे स्थानकावर माझ्या ट्रेनची वाट पाहत आहे; मात्र आजूबाजूचा परिसर पाहून धक्का बसतो आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. हे रेल्वे स्थानक आहे की कचराकुंडी, असा प्रश्न पडतो आणि हे देशातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक असलेल्या मुंबईतील स्थानक आहे, ही गोष्ट अधिकच धक्कादायक आहे, असे त्याने म्हटले आहे.
रुळांजवळील अतिक्रमण
तो पुढे म्हणतो, रेल्वे रुळांच्या अगदी जवळ लोकांनी घरे बांधलेली दिसतात. काही घरांची खिडकी तर जणू फक्त एक मीटर अंतरावर आहे, जिथून लोक चालत जातात. इतका कचरा असूनही कोणी स्वच्छता करताना दिसत नाही. त्यामुळे सरकार याबाबत काही का करत नाही, असा प्रश्न पडतो. या कचऱ्याजवळच लहान मुले खेळताना दिसतात आणि आसपास प्राणीही फिरताना दिसतात. हे दृश्य पाहून अस्वस्थ वाटते. वांद्रे स्थानक परिसरातील अतिक्रमण आणि स्वच्छतेचा प्रश्न अनेक वर्षांपासून उपस्थित आहे; मात्र परदेशी पर्यटकांच्या रील्समुळे हा विषय आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडिओंमुळे रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरातील स्वच्छता आणि अतिक्रमण हटविण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांतील प्रश्न
परदेशी पर्यटकांनी केवळ स्थानकांवरील कचरा आणि अतिक्रमणच नव्हे, तर धावत्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांतील परिस्थितीवरही लक्ष वेधले आहे. काही विदेशी यूट्युबर्स आणि रील्स स्टारनी रेल्वे गाड्यांतील प्रचंड गर्दी, अस्वच्छता आणि डब्यांच्या मूलभूत देखभालीवर टीका केली आहे. काही व्हिडिओंमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी उभे असल्याचे दिसते. तसेच काही ठिकाणी शौचालयांची अस्वच्छता, डब्यांमध्ये साचलेला कचरा आणि इतर मूलभूत सुविधांच्या देखभालीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्हिडिओंमुळे भारतीय रेल्वेच्या प्रवासी सेवांमधील स्वच्छता, देखभाल आणि प्रवासी व्यवस्थापनाबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पोस्टवर कमेंट्स-लाइक्सचा पाऊस
रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छता आणि अतिक्रमणाचे दृश्य दाखवणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. या व्हिडिओंना हजारो लाइक्स मिळाले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली. तर काहींनी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. काही भारतीय वापरकर्त्यांनी मात्र रेल्वेवरील प्रचंड प्रवासी ताण आणि शहरातील वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचाही उल्लेख केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.