मुरबाडमधील घरफोडीचा छडा
डोंबिवलीतून चोरट्याला बेड्या, सोनसाखळी हस्तगत
ठाणे, ता. २४ : मुरबाड तालुक्यातील तुळई-बादनपाडा येथील एका फार्महाऊसमध्ये शिरून सोनसाखळी आणि मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. क्रिश जितेश संघवी (रा. नवपाडा, डोंबिवली पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून २२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.
मुरबाडमधील तुळई-बादनपाडा परिसरात रवींद्र दत्तू जोशी (६२) यांचे फार्महाऊस आहे. १८ फेब्रुवारी रोजी जोशी यांनी फार्महाऊसची साफसफाई केल्यानंतर रात्री गळ्यातील सोन्याची चेन कपाटात ठेवली आणि मोबाईल चार्जिंगला लावून ते झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने रात्रीच्या अंधारात घरात प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याची चेन व मोबाईल चोरून पळ काढला होता. याप्रकरणी २० फेब्रुवारी रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपी क्रिश संघवी याला डोंबिवलीतून ताब्यात घेतले.
गुन्ह्याची कबुली
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली २२ ग्रॅम सोन्याची चेन हस्तगत केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आरमाळकर करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली ध्राटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते, सहायक पोलिस निरीक्षक कांदळकर, आरमाळकर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.