मध्य रेल्वेचे उत्पन्न १४ हजार ४४१ कोटींवर
जानेवारीपर्यंतची कामगिरी; प्रवासी-मालवाहतुकीतून मोठा महसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जानेवारी २०२६ अखेरपर्यंत प्रवासी आणि वाणिज्यिक उत्पन्नातून १४ हजार ४४१ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा महसूल मिळवला आहे. प्रवासी सेवा, मालवाहतूक तसेच इतर व्यावसायिक उपक्रमांमधून हा महसूल मिळाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
या एकूण उत्पन्नामध्ये प्रवासी वाहतुकीतून सहा हजार ५६१.३८ कोटी रुपये, मालवाहतुकीतून सहा हजार ७४१.२९ कोटी रुपये, इतर कोचिंगमधून ६४०.८० कोटी रुपये आणि विविध उत्पन्नातून ४९७.७६ कोटी रुपये मिळाले. इतर कोचिंग उत्पन्नामध्ये नॉन-फेअर उपक्रमांतून १०८.५८ कोटी रुपये, तर पार्सल वाहतुकीतून २०९.९७ कोटी रुपये मिळाल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, जानेवारी २०२६ या एकाच महिन्यात मध्य रेल्वेला एक हजार ५७९.८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये प्रवासी वाहतुकीतून ६८०.३० कोटी रुपये, मालवाहतुकीतून ७८४.०७ कोटी रुपये, इतर कोचिंगमधून ६३.०९ कोटी रुपये आणि विविध उत्पन्नातून ५१.५३ कोटी रुपये मिळाले. नॉन-फेअर उत्पन्न वाढविण्यासाठी मध्य रेल्वेने जानेवारी महिन्यात ई-लिलावाद्वारे १४ कंत्राटे दिली.
त्यातून दोन कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांचे वार्षिक परवाना शुल्क मिळणार आहे. मुंबई विभागाने ईएमयू रेकच्या आत आणि बाहेर जाहिराती, स्थानकांवरील बहुउद्देशीय स्टॉल्स, आरोग्य कियोस्क तसेच विविध ठिकाणी होर्डिंग व ग्लो-साइन्स यासाठी एक कोटी ४६ लाख १३ हजार रुपयांची कंत्राटे दिली. भुसावळ विभागाने जाहिरात फलक, गाड्यांमधील विक्री आणि प्रतीक्षालयांसाठी ८४ लाख रुपयांची कंत्राटे दिली. नागपूर विभागाने होर्डिंग्ज, प्रतीक्षालये, फलाटांवरील आरामदायी खुर्च्या, रेडिओ टॅक्सी सेवा तसेच विविध मालमत्तांच्या संचालन व देखभालीसाठी १४ लाख रुपयांची कंत्राटे दिली.
याशिवाय जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेने १७१ वेळापत्रकबद्ध, भाडेपट्टा आणि इंडेंट गाड्या चालवल्या. त्यामध्ये भिवंडी रोड- सांकराईल गुड्स यार्ड सेवा, देवळाली-दानापूर ‘शेतकरी समृद्धी एक्स्प्रेस’ आणि नागपूर विभागातून रेनिगुंटा-हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेसला जोडलेले दुधाचे टँकर अशा सेवांचा समावेश होता. मालवाहतूक आणि प्रवासी सेवा अधिक कार्यक्षम करताना महसूल वाढविण्यावर मध्य रेल्वेने भर दिला असल्याचे प्रशासनाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.