हिंद-दी-चादर उपक्रम उत्साहात
विक्रमगड (बातमीदार) : येथील विक्रमगड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हिंद-दि-चादर हा विशेष उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्री गुरू तेग बहादूर यांचा जीवनपट तसेच देशकार्य उलगडणाऱ्या गीताचे सामूहिक गायन केले. तर शिक्षकांनी गुरू तेग बहादूर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या त्यागाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया वागळे, तसेच विक्रमगड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रभू पाचमासे उपस्थित होते. या कार्यक्रमाला पाचवी ते नववी तसेच इयत्ता अकरावीतील १,१६७ विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.