ओला-सुका कचरा वेगळा न देणाऱ्यांवर पालिकेचा बडगा
दंडात्मक कारवाईला सुरुवात
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात शहर स्वच्छतेसाठी प्रशासनाने आता आक्रमक पावले उचलली आहेत. वारंवार आवाहन करूनही कचरा वर्गीकरण न करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध घनकचरा व्यवस्थापन विभागाने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. कचरा वेगळा करून न दिल्यास आता थेट दंड आणि प्रसंगी पोलिस तक्रारीला सामोरे जावे लागणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी गेल्या आठवड्यात विठ्ठलवाडी उड्डाणपूल परिसरात कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यादरम्यान, काही नागरिक ओला आणि सुका कचरा एकत्र करून आणत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत, उपायुक्तांनी आरोग्य निरीक्षक निकुंभ यांच्यामार्फत संबंधित तीन ते चार नागरिकांना प्रत्येकी २०० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला.
केवळ दंड करूनच पालिका थांबणार नाही, तर दंडाची रक्कम न भरल्यास किंवा कचरा वर्गीकरणाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही कोकरे यांनी दिला आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे कचरा वेगळा न करणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे दिसून येते.
शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणे हा एकमेव मार्ग आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे भविष्यात नागरिक सतर्क होतील आणि कचरा वर्गीकरणाचे नियम पाळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.