मुलांचे भवितव्य प्रकाशमान
पालघर जिल्ह्यातील ११ आश्रमशाळांमध्ये सौरऊर्जेचा वापर
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २५ ः पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, जव्हार तालुक्यातील ११ आश्रमशाळांमध्ये सौर पथदिवे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी ४७ लाख ७० हजारांचा निधी मंजूर केला असल्याने सौरऊर्जेतून मुलांचे भवितव्य प्रकाशमान होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये वारंवार होणाऱ्या विजेच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना अंधारात राहण्याची वेळ येत होती. याच अनुषंगाने महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (महाऊर्जा) मार्फत सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड तसेच जव्हार तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये सहा मीटर उंचीचे सोलर पथदिवे पाच वर्षांच्या व्यापक देखभाल दुरुस्तीसह, डिझाइन, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित केले जाणार आहेत. तसेच या योजनेअंतर्गत शाळा परिसर, विद्यार्थ्यांची वसतिगृहे, प्रवेशद्वार, आंतरिक रस्ते आणि आवारातील महत्त्वाच्या ठिकाणी १०६ सौर पथदिवे बसवून प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळा परिसर, विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक मजबूत होणार असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सौरऊर्जेचा प्रकाश शैक्षणिक प्रवासात नवे बळ देणारा ठरणार आहे.
-------------------------------------------
पर्यावरण संवर्धनाला हातभार
- या प्रकल्पात पाच वर्षांची देखभाल व दुरुस्तीची अट समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे बसवण्यात येणारे दिवे दीर्घकाळ कार्यरत राहणार असल्याने शाळांना अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.
- सौरऊर्जा ही स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा असल्याने पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. पारंपरिक विजेवरचा ताण कमी होऊन शाळांच्या वीजदेयकांत बचत होईल. तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
------------------------------
विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण
या प्रकल्पांतर्गत १०६ सौर पथदिवे बसवण्यात येणार असून, ग्रामीण व दुर्गम भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारात हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. विशेषतः सायंकाळनंतर वसतिगृहातून वर्गखोल्यांपर्यंत किंवा भोजनगृहापर्यंत जाताना सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत होता, पण सौर पथदिव्यांमुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. तसेच आश्रमशाळांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी निवासी असल्याने अंधारामुळे होणारे अपघात किंवा इतर धोके टाळताना विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.
---------------------------------------
सौर पथदिवे कुठे
विक्रमगड : कवळे मुलींचे वसतिगृह, आश्रमशाळा, मुरबाड मुलींची आश्रमशाळा, कुऱ्झे मुलींचे वसतिगृह, कर्हे आश्रमशाळा
वाडा : कळंभे आश्रमशाळा, गुहीर आश्रमशाळा, आमगाव आश्रमशाळा, बुधावली आश्रमशाळा
जव्हार : साकुर मुलींची आश्रमशाळा, झाप आश्रमशाळा, वांगणी आश्रमशाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.