मुंबई

महिला प्रवाशांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’

CD

महिला प्रवाशांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’
यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर; मदतीचा संदेश थेट आरपीएफ कंट्रोलला
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई लोकलमधील प्रवास म्हणजे दररोजची धावपळ, गर्दी आणि वेळेशी चाललेली स्पर्धा. या गर्दीत अनेक महिला आत्मविश्वासाने प्रवास करतात; मात्र कधी कधी असुरक्षिततेची भावना डोकावते. अशा वेळी मदतीसाठी आता दूर कुठे शोध घ्यावा लागणार नाही. कारण लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या हातातच आता ‘पॅनिक बटण’ असणार आहे. मध्य रेल्वेने महिला सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी ‘यात्री’ मोबाईल अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर उपलब्ध करून देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.
या सुविधेमुळे प्रवासादरम्यान कोणतीही अडचण किंवा धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास महिलेला मोबाईलमधील पॅनिक बटण दाबताच मदतीचा संदेश थेट रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कंट्रोल रूमपर्यंत पोहोचणार आहे. त्यानंतर नियंत्रण कक्षातून संबंधित गाडीची माहिती घेत पुढील स्थानकावर आरपीएफचे कर्मचारी तातडीने सज्ज केले जाणार आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज लाखो महिला प्रवास करतात. गर्दीच्या वेळी छेडछाड, वाद किंवा इतर अडचणी निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळणे अनेकदा कठीण होते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ‘यात्री’ अ‍ॅपमध्ये ही नवी सुविधा विकसित केली आहे. महिला प्रवाशाने पॅनिक बटण दाबताच संबंधित गाडी आणि डब्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार असून, पुढील स्थानकावर आरपीएफचे कर्मचारी त्या डब्यापर्यंत पोहोचून आवश्यक ती मदत करणार आहेत.

...लवकरच सुविधा मिळणार
यापूर्वी लोकलच्या काही डब्यांमध्ये तसेच प्लॅटफॉर्मवर पॅनिक बटणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र आता ही सुविधा थेट प्रवाशांच्या मोबाईलमध्ये येत असल्याने महिलांना मदत मागणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान असुरक्षित वाटल्यास एका क्लिकवर रेल्वे सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधता येणार आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘यात्री’ मोबाईल अ‍ॅपमधील एसओएस फीचरचे तांत्रिक काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

‘पॅनिक बटण’ कसे करेल काम?
१. ‘यात्री’ मोबाईल अ‍ॅपमध्ये एसओएस/पॅनिक बटण उपलब्ध
२. बटण दाबताच संदेश आरपीएफ कंट्रोल रूमला पाठवला जाणार
३. संबंधित गाडीची माहिती कंट्रोलला मिळणार
४. पुढील स्थानकावर आरपीएफ कर्मचारी सज्ज ठेवले जाणार
५. गाडी येताच संबंधित डब्यात तातडीने मदत


आधी कुठे होती सुविधा?
यापूर्वी काही लोकल डब्यांमध्ये पॅनिक बटण बसविण्यात आले होते. तसेच अनेक रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरही ही सुविधा उपलब्ध होती. मात्र आता पहिल्यांदाच पॅनिक बटणाची सुविधा थेट प्रवाशांच्या मोबाईलमध्ये येणार आहे. त्यामुळे महिलांना प्रवासादरम्यान एका क्लिकवर मदत मागणे शक्य होणार असून, महिला सुरक्षेसाठी रेल्वेचा हा महत्त्वाचा पुढाकार ठरणार आहे.

आतापर्यंत प्लॅटफॉर्मवर किंवा डब्यात पॅनिक बटण असल्याचे ऐकले होते; पण ते शोधणे नेहमी सोपे नसते. आता मोबाईलमध्येच ही सुविधा मिळाल्यास एका क्लिकवर मदत मिळू शकते. महिला सुरक्षेसाठी हा खूप चांगला निर्णय आहे.
- सरिता कराळे, महिला प्रवासी

महिला सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये पॅनिक बटणाची सुविधा देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. लोकलने रोज प्रवास करणाऱ्या महिलांना गरज भासल्यास एका क्लिकवर मदत मागता येणार आहे. या सुविधेमुळे महिलांना प्रवासादरम्यान अधिक सुरक्षित वाटेल.
- अश्विनी घोसाळकर, महिला प्रवासी

महिला सुरक्षेसाठी मोबाईल अ‍ॅपमध्ये पॅनिक बटण देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र प्रत्येक महिलेला स्मार्ट मोबाईलचा वापर सहज करता येतोच असे नाही. त्यामुळे महिला डब्यांमध्येही पॅनिक बटणांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसेच डब्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर लावलेली पॅनिक बटणे व हेल्पलाइन क्रमांक यांना रेल्वेकडून तातडीने प्रतिसाद मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

"तिचं कौतुक पण ट्रोलर्सच्या कमेंट्स.." नॅशनल क्रश गिरीजाचे वडील नेटिझन्सवर संतापले; म्हणाले..

SCROLL FOR NEXT