मुरलीधर दळवी : सकाळ वृत्तसेवा
मुरबाड, ता. २५ : मुरबाड शहरालगत असलेल्या ब्रिटिशकालीन बागेश्वरी तलाव परिसरात आधुनिक पर्यटनस्थळ विकसित करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. तलावाचे खोलीकरण व सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार कार्यादेश काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
या प्रकल्पामुळे तलाव परिसरात जलक्रीडा व वनविहाराच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. पर्यटकांना तलावावर झीप लाईनद्वारे हवेत तरंगत फिरण्याचा थरार अनुभवता येणार आहे. तसेच बोटिंगची सुविधा निर्माण करण्यात येत असून पुढील वर्षापासून बोटीने तलाव फेरीचा आनंद घेता येणार आहे. तलावाभोवती एक किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा गोलाकार फेरफटका मार्ग तयार विकसित करण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार असल्याने पर्यटकांना रात्री उशिरापर्यंत येथे थांबण्याची संधी मिळणार आहे.
मुरबाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या ब्रिटिशकालीन तलावाशेजारी उंच टेकडीवर ‘ऑक्सिजन पार्क’ विकसित करण्यात आले आहे. तेथून पर्यटकांना शुद्ध हवेत मुक्तपणे फिरता येणार आहे. गर्द वृक्षराजीत वसलेल्या पुरातन बागेश्वरी मंदिरात दर्शनाची सोयही आहे. तलावाच्या खालच्या भागात विविध जलक्रीडा सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी वन विभागामार्फत स्थानिक तरुणांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण चंद्रपूर येथे देण्यात आले होते. संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत बोटिंग सुरू करण्याचे नियोजन होते. तरंगती जेट्टी व झोर्बिंग बॉल सुविधा देण्याचाही प्रस्ताव होता; मात्र सध्या त्याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
मुरबाडला पाणीपुरवठा करणाऱ्या या ऐतिहासिक तलावाच्या विकासासाठी आमदार किसन कथोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तलावातील गाळ काढणे, बांधाला पिचिंग करणे, कुंपण व पायवाटा बांधणे, सौरदिवे, स्वच्छतागृह आणि संरक्षक भिंती उभारणे अशी विविध कामे नगर पंचायतीमार्फत हाती घेण्यात आली आहेत.
बोटी खरेदीचा प्रश्न अनुत्तरित
वन विभागामार्फत जलविहारासाठी चार बोटी खरेदी करण्यास मंजुरी मिळाली होती. त्यापैकी दोन बोटी सुरुवातीला खरेदी केल्याचे सांगण्यात आले. उर्वरित दोन बोटी आणि जलक्रीडेसाठी मोठा बॉल नंतर घेण्यात येणार होता. प्रत्यक्षात मात्र नव्या बोटी व बॉल पर्यटकांना दिसलेले नाहीत. एक होडी सध्या तलावावरील बागेत झाडाझुडपात असल्याचे दिसते.
ऑक्सिजन पार्क ते तलाव पायऱ्या
ऑक्सिजन पार्कपासून तलावापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. काही काळ उजाड झालेला हा परिसर आता पुन्हा निसर्गसौंदर्याने खुलणार आहे.
देखभालीअभावी पर्यटक नाराज
मुरबाडसह कल्याण-मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेल्या या परिसरात वन विभागाकडून पुरेशी देखभाल होत नसल्याची तक्रार आहे. सध्या वाढलेले गवत, पायवाटांवरील पालापाचोळा आणि जागोजागी पडलेली रेती-खडी यामुळे अस्वच्छता दिसून येत आहे. योग्य देखभाल केल्यास हा प्रकल्प तालुक्याच्या पर्यटन विकासाला नवी चालना देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुरबाड : शहरालगतच्या बागेश्वरी तलाव परिसरात विकसित होत असलेले पर्यटनस्थळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.