मास्टर्स कपवर करण क्रिकेट अकॅडमीचे नाव
ठाण्यातील श्री माँ गुरुकुल उपविजेते; स्व. यशवंतराव ओंबासे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : पोलिस हवालदार स्वर्गीय यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ आयोजित ''मास्टर्स कप चॅम्प्स टी-२० स्मृती चषक'' राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या करण क्रिकेट अकॅडमीने अटीतटीच्या सामन्यात बाजी मारत विजेतेपद पटकावले. ११ वर्षांखालील खेळाडूंसाठी आयोजित या स्पर्धेत चिमुरड्या क्रिकेटपटूंनी आपल्या बॅट आणि बॉलची कमाल दाखवली.
कल्याणच्या संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर पार पडलेल्या अंतिम सामन्यात पनवेल करण अकॅडमी आणि श्री माँ गुरुकुल स्कूल, ठाणे हे दोन संघ आमनेसामने होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना करण अकॅडमीने निर्धारित २० षटकांत ११८ धावा उभारल्या आणि ठाणे संघासमोर ११९ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना ठाणे संघाला करण अकॅडमीच्या भेदक गोलंदाजीसमोर टिकाव धरता आला नाही. शिस्तबद्ध क्षेत्ररक्षण आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर करण अकॅडमीने हा सामना जिंकून चषकावर आपले नाव कोरले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पियुष दांडेकर याला ''सामनावीर'' पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळ्याला संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे सचिव संतोष पाठक, केअर फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश ओंबासे, प्रशिक्षक करण सर, दर्शन भोईर, अजय, परेश हिंदुराव आणि मंगेश ब्रीद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
१८ नामांकित संघांचा सहभाग
ठाणे जिल्ह्यातील १८ नामांकित संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी, कल्याण व स्पोर्ट्स केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली. "कल्याण-डोंबिवलीतील लहान मुलांमध्ये क्रिकेटची अफाट गुणवत्ता आहे. या छोट्या खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध व्हावी, हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे," असे आयोजक संतोष पाठक यांनी सांगितले.