झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पात खोटे पुरावे; कारवाईची मागणी
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) : घाटकोपर पूर्वेकडील कामराजनगर येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे १६ हजार घरांच्या पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात घर मिळवण्यासाठी काही जणांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे पुरावे तयार केल्याचा आरोप पुढे आला आहे. यासंदर्भात तेलुगू समाज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुशीला बट्टू यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
१९ फेब्रुवारी रोजी क्लस्टर सर्व्हे क्रमांक एन-१९/१४७९, १४८०, १४८२ येथे काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या बायोमेट्रिक सर्व्हे करून बनावट कागदपत्रे अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचा आरोप आहे. संबंधित जागा ही गल्ली क्र. १०३, पोचअम्मा देवी मंदिराजवळील ४०×३५ फूट (१४०० चौ.फुट) क्षेत्रफळाचा अनिवासी सामाजिक हॉल असून, तो पूर्णपणे तेलुगू समाज प्रतिष्ठानच्या मालकीचा असल्याचे बट्टू यांनी स्पष्ट केले. हॉलला एकच वीजजोडणी असून, मालकी हक्काची सर्व कागदपत्रे यापूर्वी अनेकदा एसआरए कार्यालयात सादर केल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, संबंधित दिवशी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हॉलचे कुलूप तोडून काही व्यक्तींनी आत प्रवेश करत फोटो काढून बायोमेट्रिक प्रक्रिया केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे शासनाची फसवणूक होत असून, संबंधितांवर स्थानिक पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. “सदर तक्रारपत्र माझ्याकडे अद्याप आलेले नाही. कामराजनगर व माता रमाबाई आंबेडकर नगर येथील प्रकल्प मोठा असल्याने पाच-सहा स्वतंत्र पथके कार्यरत आहेत. अधिक तपशील संबंधित अधिकारी देतील,” असे डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.