टिटवाळा बनणार नवे पर्यावरण-पर्यटन केंद्र
‘निसर्गायण’ प्रकल्पाचे दिमाखात भूमिपूजन; अध्यात्म आणि पर्यावरणाचा अनोखा संगम
टिटवाळा, ता. २६ (वार्ताहर) : श्रद्धा आणि पर्यावरणाची सांगड घालणारा एक ऐतिहासिक अध्याय टिटवाळ्याच्या भूमीत लिहिला गेला. टिटवाळा-रुंदे मार्गावरील श्री स्वामी समर्थ मठासमोर ‘निसर्गायण’ या महत्त्वाकांक्षी पर्यावरण शिक्षण प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर ॲड. हर्षली चौधरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या प्रकल्पामुळे टिटवाळा आता केवळ धार्मिक केंद्र न राहता शाश्वत पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे.
पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरोव्हीजल (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने साकारत असलेल्या या प्रकल्पाला महापालिका प्रशासनाचे मोठे बळ लाभले आहे. या सोहळ्याला महापालिका आयुक्त अभिनव गोयल, नगरसेवक संतोष तरे, बंदेश जाधव, अमित धाक्रस यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. निसर्गातील गुंतवणूक ही कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देणारी असते. या प्रकल्पामुळे भविष्यात या परिसराला २०० ते २५० कोटी रुपयांचा पर्यावरणीय आणि पर्यटनात्मक लाभ मिळेल. शालेय विद्यार्थ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभागी करून घेणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले. संजय जोशी, विद्याधर वालावलकर, कविता वालावलकर, संगीता जोशी, हरेंद्र सोष्टे यांसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
श्रद्धा आणि शाश्वत विकास
टिटवाळ्यातील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर आणि हा नवा हरित प्रकल्प यांना एकत्रितपणे विकसित करण्याचे धोरण प्रशासनाने आखले आहे. अध्यात्म आणि शाश्वत विकास यांचा संतुलित मिलाफ साधणारा हा प्रकल्प पुढील पिढीसाठी ‘हिरव्या विचारांची’ बीजे रोवणारा ठरणार आहे.
‘निसर्गायण’ प्रकल्पाची वैशिष्ट्ये
विद्यार्थी आणि ज्येष्ठांसाठी येथे प्रात्यक्षिक कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आणि परिसंवाद आयोजित केले जातील. हा केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची शास्त्रशुद्ध आणि दीर्घकालीन चळवळ आहे. महापौर हर्षली चौधरी यांनी या उपक्रमाला चालना देण्यासाठी स्वतंत्र पर्यटन आराखडा तयार करण्याची घोषणा केली आहे. वाढते नागरीकरण, जलसंतुलन आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांवर हा प्रकल्प ज्ञान आणि कृतीचा दुवा ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.