तुर्भे, ता. १ (बातमीदार) : बेलापूर आणि खारघर टेकडी परिसरात अलीकडील काळात बिबट्याचा वावर वाढल्याच्या, तसेच वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरल्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सजग नागरिक मंचाने ठाणे वनविभागाकडे निवेदन सादर केले आहे. तसेच वनमंत्री, सिडको आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.
मंचाच्या मते, विकासकामांच्या नावाखाली जंगल परिसरातील मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. त्यातच जंगलात बारमाही पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे बिबट्यासह इतर वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात शहराकडे वळत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन्यजीवांनाही मानवांप्रमाणेच जगण्याचा अधिकार असून त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता नैसर्गिक अधिवासातच होणे आवश्यक असल्याचे मंचाने नमूद केले आहे.
नवीन पाणवठ्यांची निर्मिती करण्याची गरज
सेक्टर ९ मधील ग्रीन व्हॅली येथील डोंगर पायथा, तसेच फणसवाडी येथील वाघोबा मंदिर परिसरात वन्यजीवांसाठी कृत्रिम अथवा नैसर्गिक बारमाही पाण्याची व्यवस्था करावी. सेक्टर ८ मधील ऐतिहासिक तलावाचे पुनरुज्जीवन करावे, आर्टिस्ट व्हिलेज परिसरातील धरण कार्यान्वित केल्यास वन्यजीवांना पाण्याचा स्थायी स्रोत उपलब्ध होईल. तसेच पावसाळ्यात बेलापूर सेक्टर ४, ५ आणि ६ मध्ये निर्माण होणारी पूरस्थितीही नियंत्रणात येण्यास मदत होईल, वनविभागाने सिडको आणि महापालिकेसोबत समन्वय साधून संबंधित भागांचे तांत्रिक सर्वेक्षण करावे आणि आवश्यक निधी उपलब्ध करून कामांना तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी मंचाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.