नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश
७६ गुन्हे उघड; सहा जणांना अटक
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : ऑनलाइन गेमिंग आणि सायबर फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा नवी मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने पनवेलमधील पळस्पे येथील एका फ्लॅटवर छापा टाकून सहा सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. या टोळीने देशभरात केलेले तब्बल ७६ गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीने ऑनलाइन प्रतिबंधित गेमिंग ॲप चालविण्याबरोबरच वर्क फ्रॉम होम आणि शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल एक कोटी तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
या छाप्यात गौतमकुमार प्रेमचंद मनवाणी (२६), भूषण रमेश कुमार मरावी (२५), राजसिंग मनोज चौहाण (२१), अलोकप्रसाद रामलोचन मांझी (२०), निखिल पंकज बाघमारे (२५), राहुल किशोर सोना (२४) या सहा आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. हे सर्व आरोपी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील रहिवासी असून, ते पनवेलमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन ऑनलाइन फसवणूक सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या आरोपींच्या लॅपटॉप आणि मोबाईलची तांत्रिक तपासणी केली असता, या फसवणुकीचे धागेदोरे परदेशापर्यंत पसरल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच फसवणुकीचे पैसे वळवण्यासाठी आरोपींनी तब्बल ३७८ विविध बँक खात्यांचा वापर केल्याचे आढळून आले आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर दाखल असलेल्या फसवणुकीच्या ७६ तक्रारींमध्ये या टोळीचा समावेश असल्याचेदेखील तपासात आढळून आले आहे. सध्या आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, या गुह्यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिस उपआयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.